सीमा बंद! नेपाळच्या हाहा:कारात अडकले ठाण्यातील शेकडो पर्यटक!

    11-Sep-2025   
Total Views |


काठमांडू : (112 Tourists From Thane Stranded In Nepal) नेपाळमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून या ठिकाणी भारतातील सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ११२ पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधून दोन ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत. नेपाळमधली परिस्थिती गंभीर बनल्याने भारताच्या सीमारेषा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पर्यटक तिथेच अडकून पडलेले आहेत. आपल्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपल्याला भारतात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे. आमदार किसन कथोरे यांनी काठमांडू येथे अडकलेल्या नागरिकांशी थेट व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली आणि त्यांना धीर दिला.

नेपाळमध्ये अडकलेल्या या पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी संवाद साधून या पर्यटकांची परतीच्या प्रवासाची सुखरूप पणे सुटका व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे अशी माहितीही आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ८ सप्टेंबरला रात्री काही पर्यटकांशी थेट फोनवरुन संपर्क साधला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\