मुंबई : उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे बुधवार, १० सप्टेंबर रोजी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत खा. संजय राऊत आणि आ. अनिल परब हेदेखील उपस्थित असल्याचे समजते.
आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंची ही भेट पूर्वनियोजित असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याआधीही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेकदा भेटी झाल्या. उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्याआधीही विजयी मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही बंधू एकत्र आले होते. तर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले असून त्यांच्यात बैठक सुरु आहे. दरम्यान, महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट असावी का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....