मोतीलाल नगर वासीयांना सर्वांत मोठे घर ! साऱ्या मुंबईत मोतिलालनगर पुनर्विकासाची चर्चा!

Total Views |
(छाया: रिद्धेश कदम)

मुंबई, मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर सर्वसामान्य, कष्टकरी माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशात गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासात मात्र येथील रहिवाशांना तब्बल १६०० स्क्वे. फूट बांधकाम क्षेत्राचे (बिल्ट अप) नवे घर म्हाडाकडून दिले जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाकडे मुंबईतील इतर पुनर्विकासास पात्र असणाऱ्या रहिवाशांचे लक्ष लागेल आहे.

म्हाडाच्या मोतीलालनगर १,२ व ३ या चाळी आता पुनर्विकासास आल्या आहेत. या वसाहतीत ३७००हून अधिक रहिवासी अनेक वर्षांपासून नव्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. म्हाडा स्वतःच हा पुनर्विकास करणार असल्याने ठरवलेल्या वेळेत, कोणत्याही फसवणुकीशिवाय रहिवाशांना हक्काचे नवीन घर मिळणार आहे. मुंबईत आजवर कोणत्याही पुनर्विकासात रहिवाशांना एवढे मोठे घर मिळालेले नाही. गोरेगावसारख्या ‘प्राईम’ लोकेशनवर सध्या २८० स्क्वे.फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना १६०० स्क्वे.फुटांचे नवे घर मिळेल.

मोतीलाल नगर एक आधुनिक ‘टाऊनशिप’ बनत असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा ‘हॉट स्पॉट’ बनणार आहे. “नव्या मोतीलाल नगरात १६०० स्क्वे. फूट बिल्टअपच्या घराला आणखी सहा-सात वर्षांनी किमान दोन-अडीच लाख रुपये भाडे मिळेल. त्यामुळे रहिवाशांची चंगळ होईलच शिवाय या व्यवहारातून एजंटांनाही चांगला फायदा होईल”, असे गोरेगावमधील रिअल इस्टेटमध्ये गेली तीस वर्षे काम करणाऱ्या एजंटने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

स्थानिक राजकारणाला लोक कंटाळले

म्हाडाने पुनर्विकास करायचे ठरवल्यापासून मोतीलाल नगरमध्ये अनेक समित्या-संघटनांनी प्रकल्पाच्या विरोधात प्रचार सुरु केला आहे. मात्र या समित्यांमध्ये आपापसांतच अनेक भांडणे लागली असून ही मंडळी एकमेकांच्याच विरोधात उभी राहिली आहेत. यामुळे रहिवाशांचे नुकसान होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.

आम्हाला आता सुसज्ज असे घर मिळणार

“आमच्या दोन पिढ्या अरूंद, चिंचोळ्या घरांत दाटीवाटीने राहण्यात गेल्या. ही घरेही आता मोडकळीस आली आहेत. म्हाडा आता आमच्या वसाहतीचा पुनर्विकास करते आहे. आम्हाला आता सुसज्ज असे घर मिळणार असल्याने आमच्या पुढील पिढ्यांचे कल्याण होणार आहे.”

- नेहा गुप्ते (गृहिणी व मोतीलाल नगरमधील स्थानिक रहिवासी)

आम्हाला केवळ म्हाडाचे नवीन घर हवे

“इतकी वर्षे आम्ही नुसते राजकारण आणि लोकांची दिशाभूल पाहिली. आता आम्हाला या साऱ्याचा कंटाळा आला आहे. हे राजकारण पुरे झाले, आता आम्हाला केवळ म्हाडाचे नवीन घर हवे आहे.”

- विजय पोवळे (निवृत्त ज्येष्ठ स्थानिक रहिवासी, मोतीलाल नगर)




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.