टाटा पॉवरकडून मेगा इव्ही चार्जर हबचे उदघाटन

Total Views |

मुंबई, टाटा पॉवरने भारतातील सर्वात मोठी ४-चाकी ईव्ही उत्पादक कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या सहकार्याने, TATA.ev मेगाचार्जर उपक्रमांतर्गत मुंबईतील पहिल्या मोठ्या प्रमाणात सुविधा देणाऱ्या ईव्ही चार्जिंग हबचे उद्घाटन केले आहे.

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे एमडी शैलेश चंद्रा यांनी जागतिक ईव्ही दिनाचे औचित्य साधून या को-ब्रँडेड मेगा ईव्ही चार्जिंग हबचे उद्घाटन केले.

TATA.ev मेगाचार्जर हब वापरकर्त्यांच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २जवळील द लीला मुंबई हॉटेलच्या परिसरात आहे. हे शहरातील विविध ईव्ही युजर्सना म्हणजेच खाजगी कार मालकांपासून ते टॅक्सी, राईड-हेलिंग फ्लीट्स आणि लॉजिस्टिक्स ऑपरेटर्सपर्यंत सर्वांना सेवा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे अंधेरी-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)-दक्षिण मुंबई कॉरिडॉरमध्ये वारंवार प्रवास करणारे, हॉटेल्समधील पाहुणे आणि व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरेल. १२० किलोवॅट पर्यंतची गती असलेल्या आठ जलद डीसी चार्जर्सने सुसज्ज १६ चार्जिंग बे आहेत. याठिकाणी एकाच वेळी १६ इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जाऊ शकतात.

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, “टाटा मोटर्सच्या सहकार्याने बांधलेल्या या जलद-चार्जिंग हबचे लाँचिंग, भारतातील ग्रीन मोबिलिटी परिवर्तनाला चालना देण्यासाठी आमच्या एकात्मिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये अशी हब स्थापित करून, टाटा पॉवर स्वच्छ ऊर्जा उपाय प्रदान करण्याच्या आणि देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत आहे.”

नवीन TATA.ev मेगाचार्जरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, “टाटा मोटर्स भारतातील ईव्ही क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. टाटा पॉवरसोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी भारतातील ईव्ही चार्जिंग इकोसिस्टम विकसित करण्यात आणि वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.