विद्ध्वंसाचे विघ्नचिंतक

    10-Sep-2025   
Total Views |

श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ... भारताच्या शेजारी असलेल्या या तिसर्‍या देशातही सरकारी भ्रष्टाचार आणि सोशल मीडियाबंदीविरोधात प्रचंड जनआक्रोश उफाळून आला. मंत्र्यांची घरंदारं पेटवण्यापासून संतप्त आंदोलकांनी नेपाळची संसदही स्वाहा केली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अन्य मंत्र्यांसह देश सोडून पलायन केले.

परिणामी, सरकारही गडगडले. एकूणच अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या गर्तेत हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ अजूनही धुमसतो आहे. पण, नेपाळमध्ये फुटलेला हा राजकीय ज्वालामुखी बघून, भारतातही काही विघ्नचिंतकांना उकळ्या फुटू लागल्या. उबाठाचे खासदार, विश्वप्रवक्ते संजय राऊत या यादीत तर अगदी आघाडीवर. नेपाळी अर्थमंत्र्यांना लोकं रस्त्यावर पळवून पळवून मारहाण करीत असल्याचा एका भारतीय वृत्तवाहिनीचा व्हिडिओ राऊतांनी ट्विट केला. व्हिडिओसोबत ‘ये हादसा किसी भी देश मे हो सकता हैं! सावधान रहिये! भारतमाता की जय! वंदे मातरम्!’ अशी कुत्सितपणे त्यांनी मखलाशीही केली.

आता एवढे अतिव्यक्त होऊन थांबतील ते राऊत कसले. या ट्विटमध्ये त्यांनी चक्क भाजपसोबत निर्मला सीतारामन, नरेंद्र मोदी यांनाही टॅग करण्याचा खवचटपणा दाखवला. म्हणजे जे नेपाळमध्ये घडले, तसेच भारतातही घडू शकते, असे उपरोधिकपणे सूचवण्याचा राऊतांचा हा देशघातकी करंटेपणाच! म्हणा, बाह्यसंकटांवरून आपल्या देशालाही अशाच संकटात पाहण्याची सुप्त इच्छा राऊतांच्या मनी काही पहिल्यांदाच जागृत झाली, असेही नाही. बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकारविरोधात झालेल्या आंदोलनावेळीही ‘बांगलादेशच्या परिस्थितीवरून आपल्या राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा’ असे बाष्कळ विधान राऊतांनी केले होतेच. त्यामुळे श्रीलंका असो, बांगलादेश अथवा नेपाळ, या देशांची, या देशातील एकूणच परिस्थिती, देशातील नेत्यांच्या तर्‍हा आणि मुळात लोकशाहीची तुलना ही भारताशी कदापि होऊच शकत नाही, हे न कळण्याइतपत राऊत नक्कीच अज्ञानी नाहीत. पण, तरीही केवळ राजकीय कंड शमवण्याच्या खुमखुमीपोटी असे देशाचे वारंवार अहित चिंतणे, हे सर्वस्वी घृणास्पदच. त्याहीपेक्षा भारतावर अशा संकटांची वीज कोसळेल, अशी मनोमन कामना करणारे राऊतांसारखे लोकप्रतिनिधी या देशाच्या संसदेत आहे, हे या देशाचेच दुर्दैव!

भारताचे हितचिंतक

अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव असे भारताचे एक भूटान वगळता चारही दिशांना असलेले शेजारी देश गेल्या दशकभरात प्रचंड राजकीय आणि आर्थिक उलथापालथीला सामोरे गेले. यापैकी काही देश आज सावरण्याच्या मार्गावर आहेत, तर अजूनही काही देश निर्माण झालेल्या नेतृत्व पोकळीमुळे चाचपडताना दिसतात. पण, या सगळ्यात भारत हा एकमेेव अपवाद. एकीकडे भारताचा शेजार अस्थिरतेच्या महासागरात अशा गटांगळ्या खात असताना, भारत सर्व संकटांना तोंड देत ठामपणे, निश्चिलपणे अविरत उभा आहे आणि हे सर्वस्वी शक्य झाले आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि दूरदर्शी ध्येय-धोरणांमुळेच! २०१४ ते २०२५ अशी मागील ११ वर्षांच्या काळावर नजर टाकली असता, भारतासमोरही कित्येक आव्हानांचा डोंगर आ वासून समोर उभा होताच. काँग्रेसमुळे जनमनात निर्माण झालेल्या सरकारच्या भ्रष्टाचारवादी प्रतिमेपासून ते शासकीय स्तरावरील अनागोंदीपर्यंत मोदींसमोर सत्तासूत्रे स्वीकारताच, अडचणी मी म्हणून उभ्या होत्याच. पण, जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास मोदींना सार्थ ठरविला. कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, आर्थिक सर्वसमावेशीकरण, डिजिटल इंडियासारख्या योजनांतून मोदींनी सर्वांगीण विकासाची मुहूर्तमेढ रोवली.

‘कोविड’ काळातही वैद्यकीय सामग्रीपासून ते मोफत लसीकरण, धान्यवाटपापर्यंत प्रत्येक आव्हानाला मोदी सरकार तितक्याच समर्थपणे सामोरे गेले. यादरम्यान विरोधकांचे वारपलटवारही मोदींनी तितक्याच सक्षमपणे परतावून लावले. अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभे राहिले. पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकमधून धडा शिकवत सामर्थ्यशाली भारताचे दर्शनही आपण जगाला घडविले आणि असे बरेच काही... आताही ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाची झळ जगाला सहन करावी लागत असताना, मोदी सरकार संकटातून संधी शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकूणच ११ वर्षांत भारताची, भारतीयांची जगभरात मान उंचावली ती मोदी सरकारमुळेच. त्यामुळे भारताचे हितचिंतक कोण आणि विघ्नचिंतक कोण, हे जनतेलाही ठाऊक आहेच. तेव्हा, भारताची अवस्था बांगलादेश, श्रीलंकेसारखी झाली नाही आणि आताही ती नेपाळसारखीही होईल, हे स्वप्नरंजन नकोच!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची