लंगोट सुटला तरी इज्जत शाबूत अशी राऊतांची अवस्था; नवनाथ बन यांची टीका

    10-Sep-2025   
Total Views |

मुंबई : आमचा लंगोट सुटला तरी आमची इज्जत शाबूत आहे, असा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत यांचा असल्याची टीका भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार, १० सप्टेंबर रोजी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, “उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढण्याच्या नादात संजय राऊत यांचा लंगोट सुटला आहे. तरीही आमची इज्जत गेली नाही असे ते म्हणतात. कालपर्यंत संजय राऊत एनडीचे क्रॉस व्होटिंग वोटिंग होणार, आमच्यात आणि त्यांच्यात फक्त ४० मतांचा फरक आहे, असे म्हणत ढोल वाजवत होते. परंतू, आता एनडीए आणि यूपीएमध्ये जवळपास १५० जागांचा फरक स्पष्ट झाला आहे. त्यांच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केले आहे. त्यामुळे आमचा लंगोट सुटला तरी आमची इज्जत शाबूत आहे, असा केविलवाणा प्रयत्न राऊतांच्या माध्यमातून केला जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली असली तरी ते या निवडणूकीच्या व्यवस्थेत कुठेही नव्हते. काल त्यांना सैरावैरा पळताना आम्ही बघितले. या निवडणूकीत महाराष्ट्राने सर्वाधिक साथ एनडीएला दिल्याचे स्पष्ट दिसते.”

पुन्हा राज्यसभेवर संधी नाही
“संजय राऊतांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. देवेंद्रजी काय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसल्यानंतरही ते पुन्हा उभे राहिले. सर्व निवडणुकांमध्ये फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पुन्हा बघितले. संजय राऊत स्वतः अर्ध्या मतांच्या आधारावर राज्यसभेत निवडून आले आहेत. पुढील तीन वर्षांत त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला राहुल गांधींकडेच जावे लागेल. त्यामुळे देवेंद्रजींवर बोलताना दहा वेळा विचार करावा,” अशी टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत महाराष्ट्रद्रोही
“संजय राऊत हे खंडोजी खोपडे यांचे वारसदार आहेत का? ज्या खंडोजी खोपडे यांनी स्वराज्य द्रोह केला होता त्याच पद्धतीने संजय राऊत हे महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आहेत. तुमच्या पोटातले ओठावर आले, पण तुम्ही कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी त्यात तुमचेच तोंड भाजेल," असा घणाघातही नवनाथ बन यांनी केला.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....