मुंबई : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत इंडी आघाडीतील अनेकांच्या ‘अंतरात्म्याला आवाज’ फुटला आणि मतांची फाटाफूट झाली. राहुल गांधी यांच्याकडे परिपक्व राजकीय नेत्यांचे नेता होण्याची क्षमता नाही, अशी खरमरीत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवार, १० सप्टेंबर रोजी केली.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा ४५२ मतांनी विजय झाला. तर इंडी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली असून त्यांचा दारूण पराभव झाला. यावरून केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "राहुलसारखा उथळ नेता, राऊतांसारखा बोलका भोंगा, वाऱ्याच्या दिशेनुसार पाठ फिरविणारे शरद पवारांसारखे वातकुक्कुट, उद्धव ठाकरेंसारखे टोमणेबहाद्दर, लालू-अखिलेशसारखे 'गली के शेर' अशा सगळ्यांची मोट सांभाळणे हे राहुल गांधींसाठी मलेशिया-बँकॉक वारीएवढे सोपे नाहीच, उलट यामुळेच इंडी आघाडीतील अनेकांच्या ‘अंतरात्म्याला आवाज’ फुटला आणि मतांची फाटाफूट झाली. या गदारोळात मौन बाळगणारी मातोश्री आणि रामबाग बगलेत काय लपविते ते उघड करायचे धाडस राहुल गांधींकडे आहे काय?" असा सवाल त्यांनी केला.
...तोवर इंडिया आघाडीत फाटाफूट अटळ"जोवर इंडी आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असावे, असा काँग्रेसचा हट्ट राहील तोवर या आघाडीला फुटीच्या ग्रहणाने ग्रासलेले असेल, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. परिपक्व राजकीय नेत्यांचे नेता होण्याची क्षमता राहुल गांधींकडे नाही हे ठाऊक असूनही काँग्रेसमधील गांधीनिष्ठ त्यांना नेता ठरविण्यासाठी धडपडत राहतील तोवर इंडिया आघाडीत फाटाफूट अटळ राहणार हे राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या ९० व्या पराभवाने दाखवून दिले," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.