"आंदोलकांनी कार अडवली, अश्लील चाळे अन् घोषणाबाजी... आंदोलनाच्या नावाखाली मुंबई दर्शन सुरु"; अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव! टीकेनंतर पोस्ट हटवली

    01-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (Sumona Chakravarti Deleted Post) लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने नुकतेच तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली . या पोस्टमध्ये मराठा आंदोलकांनी तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचा अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले की, रविवारी दक्षिण मुंबईत प्रवास करत असताना अचानक मराठा आंदोलकांनी तिची गाडी अडवली होती. यावेळी आंदोलकांनी जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या, असा दावा तिने केला. ही संपूर्ण घटना अत्यंत अस्वस्थ करणारी होती, असे तिने म्हटले आहे. भरदिवसा मुंबईत स्वत:च्याच गाडीमध्ये असुरक्षित वाटल्याचे सुमोनाने सांगितले. या प्रकरणावरुन झालेल्या टीकेनंतर तिने ही पोस्ट सोशल मीडियावरुन हटवली आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

सुमोना चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि या घटनेबद्दल सविस्तर सांगितले. तिने लिहिले की, "आज दुपारी १२.३० वाजता मी कुलाब्याहून फोर्टला गाडीने येत होते आणि अचानक एका जमावाने माझी गाडी अडवली. गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक माणूस माझ्या गाडीच्या बोनेटवर जोरजोरात हात मारत होता आणि कुत्सितपणे हसत होता. तो माझ्या गाडीवर त्याचं वाढलेलं पोट दाबत होता. तो माझ्यासमोर नाचू लागला होता आणि त्याचे इतर साथीदार माझ्या गाडीच्या काचेजवळ आले आणि खिडकी ठोठावून जय महाराष्ट्रच्या घोषणा देत जोरजोरात ओरडत होते आणि हसत होते. आम्ही थोडं पुढे गेल्यावर पुन्हा तेच घडलं. पाच मिनिटांच्या अंतराने दोनदा ही घटना घडली. पोलीस तिथे नव्हते (आम्ही ज्या पोलिसांना पाहिलं ते निवांत बसून गप्पा मारत होते.) कायदा आणि सुव्यवस्था नव्हतीच. दक्षिण मुंबईत भरदिवसा मला माझ्याच गाडीमध्ये असुरक्षित वाटत होतं" असं तिने लिहिलंय

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, "आणि रस्ते? केळीच्या सालींनी, प्लॅस्टिकच्या बॉटल्सने, कचऱ्याने भरलेले होते. फूटपाथवर चालायला जागा नव्हती. आंदोलनाच्या नावाखाली हे आंदोलक खातायत, पितायत, झोपतायत, रस्त्यावर अंघोळ करतायत, जेवण बनवतायत, शौचालयाला जात आहेत, व्हिडिओ कॉल्स करत आहेत, रील्स बनवत आहेत आणि मुंबई दर्शन करत आहेत. नागरी कर्तव्यांची पूर्णपणे थट्टा उडवत आहेत." "मी जवळपास माझं संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये राहिलेय. मला इथे आणि खासकरून दक्षिण मुंबईमध्ये नेहमीच सुरक्षित वाटायचं. पण आज, इतक्या वर्षांत पहिल्यांदाच, तेसुद्धा भरदिवसा मला माझ्या गाडीमध्येही असुरक्षित वाटत होतं. मी नशिबवान होते कारण माझ्यासोबत माझा एक मित्र होता. जर मी एकटी असते, तर काय झालं असतं, याचा मी विचारसुद्धा करू शकत नव्हते. मला व्हिडिओ काढण्याची इच्छा झाली होती, परंतु लगेच जाणवलं की यामुळे ते आणखी भडकू शकतात किंवा त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे मी व्हिडीओ काढला नाही", असं सुमोनाने सांगितलं.

"तुम्ही कोणीही असाल, कुठेही असाल तरी कायदा-सुव्यवस्था अवघ्या काही सेकंदांत कोलमडू शकते, याची जाणीव होणंच भीतीदायक आहे. आंदोलनं शांतपणे केली जाऊ शकतात. आम्ही यापेक्षा अधिक गरजेच्या कारणांसाठी शांतपूर्ण आंदोलनं पाहिली आहेत. अशीही आंदोलनं पाहिली आहेत, जी पोलिसांकडून दाबली जातात. परंतु इथे? पूर्णतः अराजकता. एक कर भरणारी नागरिक, एक महिला आणि या शहरावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला खूप अस्वस्थ वाटलं. शासन आणि नागरी जबाबदाऱ्यांची अशा पद्धतीने खिल्ली उडवणाऱ्यांपेक्षा आपण अनेक चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत. आपल्या स्वत:च्या शहरात सुरक्षित वाटण्याचा आपल्याला अधिकार आहे", अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुमोनाने म्हटलंय की, "आपली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, असं वाटत नाही. आपला समाज चांगल्या विचारसरणीचा आहे असं वाटत नाही. ज्याचा नेहमी उल्लेख केला जातो, ती ही डिजिटल इंडिया आहे असं अजिबात वाटत नाही. कारण जेव्हा जात, धर्म, राजकारण, भ्रष्टाचार, नोकरशाही, अज्ञान आणि बेरोजगारीचा शो सुरू असतो तेव्हा त्याला विकास म्हणता येत नाही. त्याला विनाश म्हणतात." या सगळ्या प्रकरणावरुन झालेल्या टीकेनंतर तिनं ही पोस्ट सोशल मीडिया वरुन हटवली आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\