मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन - दगड मारले, कपडेही खेचले ; महिला पत्रकारांनी सांगितली आपबिती

    01-Sep-2025   
Total Views |

मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशीच आंदोलनाकांनी असभ्य वर्तन केल्याची घटना रविवार, ३१ ऑगस्ट रोजी घडली आहे. विशेषत: आंदोलकांकडून महिला पत्रकारांना घेरून ठेवण्याचा प्रकार पुढे आला असून न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवला आहे.

गेल्या चार दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी रोज तिथे उपस्थित असतात. मात्र, यावेळी आंदोलकांकडून त्यांना धक्काबुक्की केल्याचे प्रकार समोर आले आहेत. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी याबाबतची माहिती देताना स्वत:ची आपबीती सांगितली.

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जरांगेंना पत्र

रविवारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान, काही आंदोलक त्यांना स्पर्श करून गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी तिथे उपस्थित इतर आंदोलक केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने काही पत्रकार मनोज जरांगे यांना पत्र देण्यासाठी आंदोलनस्थळी गेले. तसेच त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

यावर जरांगे यांनी माझ्यासाठी अजून ७-८ दिवस हे सहन करा, असे पत्रकारांना सांगितले. त्यावर महिला पत्रकारांचे कपडे ओढणे आम्ही कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका पत्रकारांनी घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दम दिला. तसेच यापुढे कुणी गैरवर्तन करत असल्यास त्याचा फोटो काढून मला द्या. मी त्यांचे काय करायचे ते बघतो. शिवाय कुणी असे गैरवर्तन करत असल्यास त्याला तिथल्या तिथे तुडवा, असेही जरांगे यांनी सांगितले. मात्र, या घटनेमुळे वार्तांकन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या महिला पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

...तर आंदोलनाचे वार्तांकन करणार नाही

जर तुमच्या कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींना त्रास देणे थांबवले नाही तर मुंबईतील सर्व मीडिया तुमच्या आंदोलनाच्या वार्तांकनावर बहिष्कार टाकेल. तुमच्या कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले, तरच मुंबई मीडिया तुमचे वार्तांकन करेल, असा इशारा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मनोज जरांगे यांना पत्राद्वारे दिला आहे.

"रविवारी साडेतीन ते चार वाजता दरम्यान सीएसएमटी स्थानक परिसरात काही आंदोलक मला स्पर्ष करून गेले. मुंबईतील ७ ते ८ महिला पत्रकारांशी असे प्रकार घडले आहेत. महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन खपवून घेणार नाही. याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा आमचा विचार सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही आम्ही या घटनेची माहिती देणार आहोत."

- प्रणाली कापसे, प्रतिनिधी, न्यूज १८ लोकमत

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....