मुंबई : लोकशाहीमध्ये चर्चेतून तोडगा निघतो. आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघत नाही. कायद्याच्या चौकटीत बसणारे निर्णय घेण्यास सरकार तयार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दिली. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुठलेही नेते आंदोलनस्थळी गेले असता त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. अशा प्रकारे बॉटल फेकणे योग्य नाही. २०१४ पासून तर २०२५ पर्यंत अडीच वर्षांचे उद्धव ठाकरे यांचे सरकार वगळता आमच्या सरकारमध्येच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. आता मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करत आहेत त्याच्याकडे आम्ही सकारात्मकतेने पाहात आहोत. कुठलीही मागणी मान्य करताना ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली जात आहे. पण न्यायालयाचे काही निर्णय आले असून या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत बसणारे निर्णय घेण्यासाठी सरकार तयार आहे. पण कायद्याच्या चौकटीबाहेर निर्णय सरकराने घेतलाच तर तो एकही दिवस टिकणार नाही. त्यात मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींची चर्चा करतो आहोत. लोकशाहीमध्ये चर्चेतून तोडगा निघतो. आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघत नाही. सरकार हे कायद्याने चालते. त्यामुळे कायदेशीर मागण्या पूर्ण करण्यास सरकारची हरकत नाही. कायदेशीर अडचणींतून मार्ग काढल्याशिवाय निर्णय करता येत नाही."
चर्चा केल्यावर मार्ग निघू शकतो"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण शिंदे समिती तयार केली. शिंदे समितीमुळे बऱ्याच कुणबी नोंदी सापडल्या. आता हैदराबाद गॅझेटचे कामही आपण शिंदे समितीकडेच दिलेले आहे. पण आम्हाला आताच आणि इथेच आरक्षण द्या असे जरांगे यांचे मत आहे. हे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता ते कसे शक्य आहे? निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी स्वत: आझाद मैदानावर जाऊन काय प्रक्रिया आहे हे त्यांना सांगितले. शेवटी सर्वांनी चर्चा केल्यावर मार्ग निघू शकतो," असेही त्यांनी सांगितले.
लोक कतृत्वाने लक्षात ठेवतात"मला लोकांच्या शिव्या खाणे, उपहास सहन करणे, या सगळ्यांची सवय आहे. माझ्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. कारण लोक तुम्हाला तुमच्या कर्तृत्त्वाने इतिहासात लक्षात ठेवतात. आपले कर्तृत्व काय आहे हे महत्त्वाचे आहे. मला कोणीही कितीही शिव्या दिल्या तरी जे समाजाच्या हिताचे आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जे सांगितले आहे त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.