मुंबई, समाजाची सज्जनशक्ती तुमच्या सोबत आहे. आपली दृष्टी सकारात्मक असेल तर समाज नेहेमी साथ देतो.” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी केले. दै. मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयात किन्नरभगिनींसोबत ‘रक्षांधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. दै. मुंबई तरुण भारतच्या सामाजिक विभागाच्या प्रमुख योगिता साळवी यांनी, आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, "ज्यांच्याकडे सगळं काही आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही अशा दोन्हीकडच्या लोकांना एकत्र आणणं हा दै मुंबई तरूण भारतच्या सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट आहे. त्याउद्दिष्टातूनच हा रक्षाबंधानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.”यावेळी व्यासपिठावर राहुल पाठारे, विश्वस्त भारतीय विचार दर्शन , उमेश रॉय चौधरी,चिप बिझनेस ऑपिसर, गौरी परब, प्रशासन व्यवस्थापक, जितेंद्र सोनावणे, ऑपरेशन हेड, सेवा भारतीचे विलास तावडे,आनंद राऊळ,अरूण गव्हाणकर,अरविंद शिंदे ,उद्योजक क्षितीज वेदक, पाठिराखा ट्रस्टच्या अध्यक्ष केशव जोशी, सक्षम चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रिती उपाध्याय यांची प्रमुख उपस्थित होती.
यानंतर काही किन्नर भगिनींनी मनोगत व्यक्त केले. जान्हवी गोस्वामी म्हणाल्या, "आम्हाला आता समाजात मान्यता मिळाली आहे पण हक्क मिळालेले नाहीत. आम्ही याच समाजाचा भाग आहोत की नाही हा माझा प्रश्न आहे. ”यानंतर या शिवाजी रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करणार्या सुधा पुजारी यांनी ी यावेळी बसमध्ये एक सीट तृतीय पंथींसाठी राखीव असावी, अशी मागणीही केली. सुधा पुजारी या मुंबईतील पहिल्या तृतीय पंथी रिक्षाचालक आहेत. यावेळी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, राज्य लोकसभा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करणार्या रितू कसबे यांनी सांगितले की, "मी पोलीस भरती आणि तलाठी भरतीच्या परिक्षा दिल्या पण या परिक्षेला बसलेल्या देशभरातील ७३ तृतीय पंथींपैकी एकीलाही तलाठीची नोकरी मिळाली नाही.” भायखळ्याच्या रेहाना शेख यांनी, "आमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्डसाठी जन्माचा दाखला मागतात. आम्हाला घरातून बेदखल केलं जातं, आम्ही हा दाखला कुठून आणणार?” अशी खंत व्यक्त केली.
सेवा भारतीचे विलास तावडे, आनंद राऊळ, अरूण गव्हाणकर यांनी किन्नरांसदर्भात सेवा भारती, प्रशासकीय योजना याबाबत माहिती दिली. तसेचपाठीराखा प्रतिष्ठानचे केशव जोशी सक्षम चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रीती उपाध्याय, यांनीही आपले विचार मांडले. यावेळी रक्षाबंधनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर देवरे यांनी केले.