अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या नावाखाली लाखोंचा घोटाळा बनावट विद्यार्थ्यांची नावे पोर्टलवर नोंदवली?

    09-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूर येथे अल्पसंख्याक (मुस्लिम) विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीशी संबंधित मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये २७ मदरसे आणि अन्य काही शाळांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून किमान ५७ लाख रुपयांचा हा घोटाळा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अशी माहिती आहे की, पोलिसांनी मोहम्मद रफिक खान, शबनम शाह, शहनाज खानम, आफताब खान आणि आफताब या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

तपासात उघड झाले की या मदरसे व शाळांचे संचालक लाखो रुपयांची शिष्यवृत्ती फसवणूक करून घेत होते. सध्या या फसवणुकीस जबाबदार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असून सदर प्रकरणाचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. अहवालात असेही म्हटलेय की, आरोपी आफताब खानच्या एका शाळेला ७ लाख रुपयांहून अधिक शिष्यवृत्ती मिळाली होती. मात्र, याबाबत तपास केला असता, ती शाळाच मुळात अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले.

त्यानंतर असे लक्षात आले की, ९ वी व १० वी साठी बनावट विद्यार्थ्यांची नावे पोर्टलवर नोंदवली जात होती आणि नंतर या कथित संस्थांनी स्वतःच्या लॉगिनद्वारे त्या विद्यार्थ्यांच्या खोट्या नोंदी पुढे नेल्या. तपासात अशा एकूण २७ संस्थांना संशयित म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. सध्या या फसवणुकीचा तपास सुरू असून दोषी आढळल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक