राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, मतांची चोरी केल्यांचा दावा

    07-Aug-2025   
Total Views |


नवी दिल्ली : (Rahul Gandhi alleges Election Commission) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेबाबत सादरीकरण करत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा दावा करत आहेत. यावर निवडणूक आयोगाने त्यांच्या या दाव्यांना निराधार आणि बेजबाबदार म्हटले होते.

काय म्हणाले राहुल गांधी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ४० लाखांहून अधिक मतं ही संशयास्पद आहेत असं राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोग या याद्यांवर गप्प का? असे म्हणत त्यांनी थेट निवडणूक आयोगाला जाब विचारला. ते म्हणाले, "महाराष्ट्र निवडणुकीत ४० लाख मतांचा घोटाळा झाला. महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळी पाच महिन्यांत इतके मतदार वाढले जे मागच्या पाच वर्षात वाढले नव्हते, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यांत ४० लाख मतदार वाढले. ही बाब आश्चर्यकारक आहे. त्याचबरोवर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान मोठ्या प्रमाणावर वाढले होते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळाले. पण विधानसभा निवडणुकीत आम्ही बाहेर फेकलो गेलो. यादरम्यान १ कोटी मतदार वाढले. हे असे कसे झाले याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही मतदारांची यादी मागवली पण ती देण्यास आम्हाला निवडणूक आयोगाने नकार दिला."

नव्या मतदारांबाबत काय म्हणाले राहुल गांधी?

नव्या युवा मतदरांनी भाजपला मतदान केले असे सांगण्यात आले. त्यासाठी फॉर्म ६ चा उपयोग करण्यात आला. पण ३३ हजार ६९२ नावांचा दुरुपयोग करण्यात आला. ३३ हजार ६९२ नावांपैकी एकही नाव असे नाही जे खरे आहे. ही संपूर्णच्या संपूर्ण यादी खोटी आहे. बंगळुरु लोकसभा निवडणुकीत ही अशा पद्धतीने मतांची चोरी करण्यात आली हे राहुल गांधीनी सादरीकरण करताना सांगितले.

पुढे राहुल गांधीनी भाजपने मतांची चोरी केल्याचा आरोप केला. डुप्लिकेट व्होटर्स, एक मतदाराचं नाव मतदार यादीत जास्तवेळा येणे. मतदारांचे खोटे पत्ते आणि तपशील देऊन बनावट ओळखपत्र देणे, एकाच पत्त्यावर ५० ते ६० लोक राहात असल्याचं दाखवण्यात आले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ४ ते ५ लोकच राहात होते. तसेच चुकीचे फोटो वापरले जे मतदार यादीत स्पष्ट दिसणार नाही किंवा नीट ओळखता येणार नाही. फॉर्म ६ चा चुकीचा वापर करत मतदार याद्यांमध्ये घोळ केला, असे दावे त्यांनी यावेळी केले.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\