अमित शाहंच्या हस्ते सीतामढीतील जानकी मंदिराचा शिलान्यास ; तीन दिवस रंगणार भव्य उत्सव

    07-Aug-2025   
Total Views |

मुंबई : बिहारच्या सीतामढी येथील पुनौरा धाममध्ये माता सीतेचे एक अद्भुत मंदिर बांधले जाणार आहे. शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होईल. हा समारंभ तीन दिवस भव्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याचे, पुनौरा धाम मंदिराचे महंत कौशल किशोर दासजी यांनी सांगितले.

ते म्हणाले, या पायाभरणी समारंभासाठी घरोघरी निमंत्रणे देण्यात आली आहेत. त्यावेळी भाविकांना अक्षता व तुळशीची पाने देऊन त्यांना खास आमंत्रित केले होते. माता जानकीच्या दिव्य मंदिराच्या पायाभरणीसाठी ११ नद्यांचे पवित्र पाणी आणण्यात आले आहे. यामध्ये गंगा, यमुना, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, पिंडर, धौलीगंगा, लक्ष्मण गंगा, सरस्वती, कमला आणि सरयू नद्यांचा समावेश आहे.

पुढे ते म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाने पायाभरणी समारंभाच्या संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकांना दिवे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या दिवशी, मंदिर तसेच सीताकुंड संकुल ५१,००० दिव्यांनी सजवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

मंदिर संकुलाच्या परिसरात प्रवेशद्वार, विश्रामगृहे, यज्ञशाळा, उपहारगृह, ध्यान केंद्रे आणि प्रवचन हॉल देखील बांधले जाणार आहेत. पर्यटन सुविधांच्या विकासाअंतर्गत संकुलात हॉटेल्स, विश्रामगृहे, संग्रहालये, स्मृतीद्वार आणि स्मारक इमारती बांधल्या जातील. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात हिरवळ राखण्यासाठी सुंदर जलाशय आणि कारंजे बसवले जातील आणि बागाही बांधल्या जातील. यासोबतच 'सीता-वाटिका' आणि 'लव-कुशवाटिका' देखील विकसित केल्या जातील.

मंदिर बांधकामासाठी ८८२ कोटी रुपयांचे बजेट

बिहार मंत्रिमंडळाने पुनौरा धाम येथील मंदिराच्या बांधकामासाठी ८८२.८७ कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली. या रकमेपैकी १३७ कोटी रुपये जानकी मंदिराच्या बांधकामासाठी आणि ७२८ कोटी रुपये पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरले जातील. १० वर्षांसाठी त्याच्या देखभालीसाठी १६.६२ कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० एकर जमीन संपादित केली जाईल.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक