मुंबई : " चित्रपटसृष्टीचंजे वैभव आज आपल्याला बघायला मिळत आहे, ते एका मराठी माणसाच्या कार्यामुळे मोठे झाले. आज्या हिरक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मी सर्व कलावंतांना अश्वस्त करू इच्छितो की मराठी चित्रपट सृष्टीच्या मागे आणि सदैव उभे राहू " अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चावरे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य विभाग सचिव किरण कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी रसिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की " आज इतक्या मोठ्या संख्येने कलावंतांचा होणारा सन्मान सोहळा, आनंददायी आहे. आपल्या समर्थ अभिनयाने, इतकी दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या काजोल, अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर, उत्कृष्ट दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा सन्मान अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर गझलकार भीमराव पांचाळे यांचा गौरव म्हणजे मराठी कला मनांचा गौरव आहे. त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले समाविष्ट करण्यासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं असे भारताचे राजदूत विशाल शर्मा यांचा होणारा गौरव ही कौतुकास्पद बाब आहे. "
दि. ५ ऑगस्ट रोजी, सायंकाळी वरळी डॉम येथे सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या कार्याचा अनमोल ठसा उमटवणाऱ्या कलावंतांचा व कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या नव्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली ज्याच्या अंतर्गत सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. यावर्षी भारताचे राजदूत, युनेस्को प्रतिनिधी, विशाल शर्मा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये व्हावा यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या विशाल शर्मा यांचा गौरव यावेळी करण्यात आला. सदर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या की " चित्रपट सृष्टीचे दैदी प्रमाण पर्व आता सुरू आहे. आपला भारत देश महासत्ता होण्याच्या तयारीत असताना या राष्ट्राचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, त्याचबरोबर येणाऱ्या काळात कलेसाठी सकारात्मक वातावरण आपल्याकडे तयार होईल हे नक्की. शासन व्यवस्था कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील."
या सोहळ्यात ‘हीरक-स्मृती’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेत पुरस्कार सोहळ्याच्या गेल्या ६० वर्षांतील गौरवशाली प्रवासाला शब्दचित्रमय उजाळा देण्यात आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची जगाला मोहिनी!
" मराठी चित्रपट आता केवळ आपल्या सीमांपुरते मर्यादित राहिले नसून, सातासमुद्रापार मराठी सिनेमाचा डंका वाजतो आहे. जगाच्या सृजन आणि संस्कृतीवर मराठी चित्रपट सृष्टीने केव्हाच मोहिनी घातली आहे. मराठी चित्रपटसृष्टी मध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे आपण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला. येणाऱ्या काळात मराठी सिनेमांसाठी व्यावहारिक दरामध्ये चित्रपटगृह उपलब्ध होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असू."
आशिष शेलार
सांस्कृतिक कार्यमंत्री.