नवी दिल्ली : (Uttarakhand Cloudburst) उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला पूर आला. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यामुळे अख्खे गाव वाहून गेले. अवघ्या ३४ सेकंदांत अनेक हॉटेल्स आणि घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६० - ७० लोक बेपत्ता असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत लष्कराचे १० जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसंच येथील हेलिपॅड पूर्णपणे मलब्यात गायब झाले असून लष्करी छावणीचंही नुकसान झाले आहे.
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक संकटात भारतीय लष्करालाही मोठा फटका बसला आहे. हर्षिलमधील १४ राजरिफ युनिटच्या कॅम्पला पुराचा फटका बसला असून, १० जवान आणि एक जेसीओ अद्याप बेपत्ता आहेत. एक अधिकारी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या आपत्तीतही लष्कराचे अधिकारी आणि जवान बचावकार्यात सहभागी झाले असून, आतापर्यंत त्यांनी १५ जणांचे प्राण वाचवले आहेत. या भागात नदीकिनारी असलेले हेलीपॅड देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे, ज्यामुळे हेलिकॉप्टरमार्फत मदत कार्य करणे अशक्य झाले आहे. उत्तरकाशीहून धरालीकडे येणाऱ्या मार्गावर नेतला भागात भूस्खलन झाल्याने रस्ते बंद झाले आहेत आणि बाहेरुन मदत पोहोचवणे अत्यंत कठीण झाले आहे.
एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिस, लष्कर आणि अन्य आपत्कालीन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. खीरगड नाल्याच्या पूरामुळे परिसरात आणखी नुकसान झाले असून, सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेले लष्कराचे जवान मदतकार्य करत आहेत.सध्या पूर्ण परिसरात मदतकार्यात अडथळे येत असून हवामानही साथ देत नाही. मात्र सर्व यंत्रणा याठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. हर्षिल आणि धराली परिसरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\