मुंबई : कबुतरखाना बंद केल्याप्रकरणी दादरमधील कबुतरखाना परिसरात बुधवार, ६ ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन करण्यात आले. कबुतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकत काही महिला आंदोलनकर्त्यांनी कबुतरांना खायला दिले. यावेळी कबुतरखाना परिसरात मोठी गर्दी जमली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद केला. परंतू, त्यानंतर कबुतरांना खाद्य देणे बंद केल्यामुळे ते मरून पडत असल्याचे सांगत जैन समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बैठक घेतली. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसून पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर बुधवारी सकाळी काही लोकांनी दादर कबुतरखाना परिसरात मोठे आंदोलन केले. कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवून आंदोलकांनी तो पुन्हा सुरू केला आणि तिथे धान्य टाकून कबुतरांना खाणेही दिले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीही झाली. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. ही घटना दुर्दैवी असून सर्व नागरिकांनी संयम आणि शांतता राखावी, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलन करणारे बाहेरचे लोक - मंत्री मंगलप्रभात लोढा
"याठिकाणी सकाळी जे काही झाले ते अत्यंत चुकीचे होते, मी अधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर मंदिराच्या ट्रस्टींसोबत चर्चा केली. यामध्ये ट्रस्टींची काहीही भूमिका नाही, त्यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. जे काही सकाळी झाले ते बाहेरील लोकांनी केले आहे. त्यांनी कालची बैठकही पुढे ढकलली होती. मुख्यमंत्र्यांनी काल जे काही निर्देश दिले होते, त्यामध्ये ते समाधानी आहेत आणि त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले. त्यानंतर काही लोकांनी इथे येऊन जो प्रकार केला, त्यात जैन समाज किंवा साधुसंत कुणीही सहभागी नव्हते.यामध्ये बाहेरचे लोक कोण होते हे माहिती नाही. पण यामध्ये मंदिराच्या ट्रस्टचे कुणीही नव्हते. सर्व नागरिकांनी संयम आणि शांतता राखावी, कुणीही कायदा हातात घेऊ नये," असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.
धार्मिक भावना आणि आरोग्याची सांगड घालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"एकीकडे धार्मिक आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्यदेखील आहे. या दोघांचीही सांगड आपल्याला घालावी लागेल. लोकभावना आणि धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ज्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. काल आम्हाला काही मार्ग सुचले असून ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची परंपरादेखील खंडित होणार नाही आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही."