अनधिकृत बारवर मनपाची कारवाई; ‘लिव्हिंग लिक्विडस्’चे परवाने रद्द

    06-Aug-2025
Total Views |

मुंबई : लोअर परळ येथील कमला मील परिसरात अनधिकृत रीत्या सुरू असलेल्या ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या उपाहारगृहावर मनपाने कठोर कारवाई करत परवाने रद्द केले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार ही कारवाई आज करण्यात आली.

सदर आस्थापनाने गारमेंट शॉप आणि टेलरिंग शॉपच्या जागी अनधिकृतपणे रेस्टॉरंट, बार व वाईन शॉप सुरू केले होते. तळमजल्यावर टेलरिंग शॉपच्या जागी डायनिंग सुरु करण्यात आले होते, तर पहिल्या मजल्यावर गारमेंट शॉपऐवजी बार व वाईन शॉप सुरू करण्यात आले होते.

या अगोदर, ३१ जुलै रोजी कमला मील परिसरातील थेओब्रोमा, मॅकडोनाल्ड्स, शिवसागर हॉटेल, नॅनो’ज कॅफे, स्टारबक्स, बीरा टॅप्रूम, टोस्ट पास्ता बार,फूड बाय देविका आणि बीकेटी हाऊस याठिकाणीही पाडकाम व जप्तीची कारवाई झाली होती.

या कारवाईमुळे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, अशा सर्व अनधिकृत आस्थापनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.