"जे झालं ते चुकीचं पण हे बाहेरील लोक…"; कबुतरखाना राडाप्रकरणी मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया!

    06-Aug-2025   
Total Views |

मुंबई : (Mangal Prabhat Lodha) दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेल्या राडाप्रकरणात आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले आहे. बुधवारी ६ ऑगस्टच्या सकाळी कबूतरखान्याजवळ गोंधळ घालणारे, पोलिसांशी हुज्जत घालणारे आणि तोडफोड करणारे लोक बाहेरचे असल्याचे मंत्री लोढा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "मला माहिती मिळाल्यानंतर मी लगेचच इथे आलो. याठिकाणी सकाळी जे काही झालं ते अत्यंत चुकीचं होतं, मी अधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर मंदिराच्या ट्रस्टींसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, त्यांची यामध्ये काहीही भूमिका नाही, त्यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही. जे काही सकाळी झालं ते बाहेरील लोकांनी केलं आहे. त्यांनी कालची बैठकही पुढे ढकलली होती. मुख्यमंत्र्यांनी काल जे काही निर्देश दिले होते, त्यामध्ये ते समाधानी आहेत आणि त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले."

"सकाळी जो चुकीचा प्रकार घडला, त्यामध्ये जैन समाज किंवा साधुसंत कोणीही सहभागी नव्हते. सकाळी जे झालं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कायद्याला आम्ही हातात घेणार नाहीत, असेही ट्रस्टींनी आम्हाला सांगितले. मी देखील लोकांना विनंती करतो की, शांतता राखा. उद्या कोर्टाची सुनावणी आहे. जे कोणी हे केले त्यांनी कबूतरांचे देखील मोठे नुकसान केले होते. बाहेरचे लोक कोण होते हे माहिती नाही. पण यामध्ये मंदिराच्या ट्रस्टचे कोणीही लोक नव्हते", असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\