महादेव मुंडे हत्या प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षिस, एसआयटीकडून नागरिकांना आव्हान

    06-Aug-2025   
Total Views |


बीड : (Mahadev Munde Case) बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्याप्रकरणी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला आहे. अशातच आता एसआयटीकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला आता पोलिस प्रशासन रोख बक्षिस देण्यात येणार असून, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आव्हान केले असल्याची माहिती बुधवारी ६ ऑगस्ट रोजी दिली.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीकडून आता वेगाने तपास सुरू झाले आहे. मात्र, काही ठोस पुरावे किंवा माहिती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना एसआयटीने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, "या प्रकरणातील कुणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तात्काळ द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल."

महादेव मुंडे यांच्या हत्येला आता २१ महिने उलटून गेले आहेत. अश्या परिस्थितीत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीचे प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाने कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे. व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नातेवाइकांसह सर्वत्र व्यक्त होत आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\