अवतीभोवतीच्या जगात आपण किमान दहाएक माणसांना तरी दररोज भेटतोच आणि अनेकजण आपल्याला ओळखतही असतात. लोक आपल्याला नावाने ओळखतात, चेहरा लक्षात ठेवतात, आपल्या व्यवसायाबद्दल, यशाबद्दल किंवा आपण समाजात पार पाडत असलेल्या भूमिकांबद्दल माहिती ठेवतात. पण, त्यापैकी खरंच कितीजण आपल्याला समजतात? कितीजण आपल्या चेहर्याच्या पलीकडे आपल्याला पाहतात? आपल्या विचारांच्या सखोलतेत, आपल्या निःशब्द लढ्यांमध्ये, आपल्या नैतिकतेमध्ये आणि आपल्या शांत स्वप्नांमध्ये?
ओळख असणे आणि समजून घेणे, यामधील फरक हा ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. आयुष्य हे केवळ तथ्यांवर आधारित नसतं, तर आपण स्वतःकडे आणि इतरांकडे कसे पाहतो, या दृष्टिकोनावर आधारित असतं.
आजच्या अतिशय जोडलेल्या (hyperconnected) डिजिटल जगात ओळख प्रस्थापित करणे, हे एका क्लिकवर अतिशय सोपे झाले आहे. सोशल मीडियावर आपले वाढदिवस, सण, मतं आणि मनःस्थितीसुद्धा दिसते. आपण आपली हास्ये, विजय आणि काळजीपूर्वक निवडलेली अनेक दृश्ये शेअर करतो. जगासाठी हेच सारे आपली ओळख बनते. पण, खरा अर्थ याच्या खालच्या थरात असतो.
खूप लोकं फारच मर्यादित संवाद, अर्धवट संभाषणं किंवा ऐकीव माहितीच्या आधारावर आपल्याबद्दल शाश्वत मतं तयार करतात. ते आपल्याला डॉक्टर, शिक्षक, कलावंत, शेजारी, पालक अशा शीर्षकांतून ओळखतात. पण, फारच थोडे लोक थांबून विचार करतात की, या भूमिकेमागे नेमकं कोण आहे?
जेव्हा लोक एखाद्याबद्दल म्हणतात की, ‘मी ओळखतो त्यांना’ तेव्हा ते अनेकदा त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेल्या त्या व्यक्तीच्या प्रतिमेबद्दल बोलत असतात. त्यांनी खरे तर त्या व्यक्तीशी वैयक्तिक संवाद कधीही साधलेला नसतो. त्या व्यक्तीची माहिती त्यांच्या वैयक्तिक ‘फिल्टर’, अनुभव आणि पूर्वग्रहांवर आधारित असते. म्हणूनच अस्सल ‘समजलं जाणं’ ही दुर्मीळ पण अत्यावश्यक गरज आहे, असे म्हणता येईल.
एखाद्याला समजून घेतलं जाणं ही एक दुर्मीळ आणि खोलवरची मानवी गरज आहे. त्यासाठी वेळ, संयम आणि भावनिक मोकळेपणा लागतो. हे सर्व आजच्या माऊसवर चालणार्या झपाट्याच्या जगात फारच दुर्मीळ म्हणावे लागेल. कोणाला समजून घेण्यासाठी फक्त ऐकणं पुरेसं नाही; खरं ऐकणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, केवळ जे दिसेल ते पाहणं नव्हे, तर न बोललेलं जाणवून घेणे. उदाहरणार्थ, त्यांची भीती, मूल्यं आणि भावनिक इतिहास जो त्या व्यक्तीची एकूणच जगाशी प्रतिक्रिया ठरवत असतो. जेव्हा कोणी आपल्याला खरं समजून घेतं, तेव्हा एक शांत समाधानाची जाणीव होते. आपल्याला स्वतःला समजावून सांगावं लागत नाही. कारण, आपल्याला ती व्यक्ती आपल्या ताकदींसकट आणि त्रुटींसकट, आपल्या विचारांपासून ते भावनांपर्यंत समजून घेते.
दृष्टिकोन का महत्त्वाचा?
दोन व्यक्ती एकाच व्यक्तीकडे पाहू शकतात. एकजण म्हणेल, किती बेरकी आहे. दुसरा म्हणेल, त्याच्यात हुशारी आणि आत्मविश्वास आहे. हा फरक आहे दृष्टिकोनाचा!
आपलं बिकट बालपण, संघर्ष, गमावलेली माणसं, मिळवलेले यश हे सगळं आपली जग पाहण्याची काच तयार करतं. म्हणूनच इतरांना समजून घेण्यासाठी आपल्यात सचोटी असणं गरजेचं आहे. म्हणजेच, आपली एखाद्याबद्दलची नजर हे एकमेव सत्य नाही; नाण्याची दुसरी बाजू असावी, हे मान्य करणंही महत्त्वाचं. स्वतःच्या दृष्टिकोनावरूनच आपण तयार केलेल्या गैरसमजांतून आपण एखाद्या गोष्टीला कसा प्रतिसाद देतो, हे ठरतं. जर आपल्याला सतत इतरांकडून मान्यता हवी असेल, लोक जेव्हा आपल्याविषयी असत्य मतं बनवतात, तेव्हा आपण साहजिकच दुखावतो. पण, आपल्याला हे समजलं की, बहुतेक लोक अर्धवट माहितीच्या आधारे निर्णय घेतात, तेव्हा आपण कोणतेही स्पष्टीकरण न देता, अधिक शांत आत्मविश्वासाने वागू शकतो. वेळप्रसंगी त्यांच्याकडे दुर्लक्षही करतो. हे जाणून की, सगळेचजण आपल्याला समजून घेतील, असं गरजेचं नाही. हे अगतिक वाटू नये, उलट ते मुक्त करतं. कारण, त्यामुळे आपण प्रतिक्रिया देण्याचं थांबवतो आणि स्वाभाविक वागणं सुरू करतो. लोकांचे गैरसमज असूनही आपण आपल्यासारखं जगायचं धैर्य जोपासलं पाहिजे. जोपर्यंत आपली मूल्ये आपल्याशी जुळत असतात, आपले हेतू स्वच्छ आहेत आणि आपलं मन योग्य जागी आहे, तोपर्यंत आपण प्रत्येकाच्या गुणगौरवाची अपेक्षा बाळगायची गरज नाही. आपल्याला जर आयुष्यात काही मोजक्या, जवळच्या लोकांकडून, एखादा मित्र, भाऊ-बहीण, जोडीदार, गुरू यांनी प्रामाणिकपणे समजून घेतलं असेल, तर आपण खरोखर समृद्ध आहोत. ‘समज’ ही संख्येची गोष्ट नाही, तर ती आत्म्याच्या पोषणाची गोष्ट आहे. आपण सर्वजण समजून घेतलं जाणं ही इच्छा बाळगतो, पण आपण इतरांना किती वेळा समजून घेण्याचा प्रयत्न करतो? आपण किती वेळा पूर्वग्रहाशिवाय ऐकतो?
आजच्या गैरसमजांनी भरलेल्या जगात, कदाचित सर्वांत प्रभावी कार्य म्हणजे दुसर्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं. प्रत्येकजण आपल्यासारखीच अशी लढाई लढत आहे, जी आपल्याला दिसत नाही, हे जाणणं. जेव्हा आपण आपला दृष्टिकोन गृहीतकांपासून, प्रतिक्रियेपासून चिंतनाकडे वळवतो, तेव्हा आपण एक अधिक मृदू, अधिक सामायिक जग घडवतो. आपण अनेकांना ओळखीचे असतो, पण त्यांनी आपल्याला आतून खरंच समजणं ही एक दुर्मीळ, मौल्यवान गोष्ट आहे.
आयुष्य लाईक्स, फॉलोअर्स किंवा ओळखींच्या तराजूत मोजू नये, तर ते मोजावं आपल्या घनिष्ट संबंधांच्या प्रामाणिकपणात, आपल्या नात्यांतील त्या क्षणांत, जेव्हा कुणीतरी खरोखरच म्हणतं, ‘मला तू खरंच समजून घेतोस.’ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपण ‘त्या कुणीतरी’सारखे केवळ ‘ओळखीचे’ नव्हे, तर खरंच ‘समजणारे’ बनूया! कारण, असं केल्यामुळे आपण इतरांचे आयुष्य समृद्ध करतोच, पण स्वतःलाही अधिक खोलवर समृद्ध करतो.
डॉ. शुभांगी पारकर