
समरसता साहित्य परिषदेचे २०वे साहित्य संमेलन दि. २ आणि दि. ३ ऑगस्ट रोजी नांदेड येथे संपन्न झाले. या ‘नवोद्दतरी साहित्य आणि समरसता’ विषयावर संमेलन आधारित होते. संमेलनाचे अध्यक्ष होते ‘पद्मश्री’ नामदेव कांबळे, तर स्वागताअध्यक्ष होते खा. डॉ. अजित गोपछडे. संमेलनाला नांदेड गुरूद्वाराचे बाबा सतनाम सिंग यांचा आशीर्वाद लाभला, तर काही विघातक लोकांच्या धमक्यांमुळे महाथेरो राहुल बोधी हे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही, अशी चर्चा होती. तरीही, सर्वार्थाने चर्चेत राहिलेल्या या सर्वांगसुंदर संमेलनाचा मागोवा या लेखात घेतला आहे...
आम्ही नांदेडमध्ये हे संमेलन होऊच देणार नाही. बघतोच कसे हे संमेलन होते ते, अशा धमक्या समरसता साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात मिळाल्या. ते काही लोक मिळेल त्या मार्गाने विरोध करत होते. पण, आम्ही त्यांना विरोध केला नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा आमची रेष मोठी केली आणि आज संमेलन सर्वार्थाने यशस्वी झाले.” माणिकराव भोसले सांगत होते. काय नव्हते त्यावेळी त्यांच्या शब्दांत? आनंद, अभिमान आणि विरोधासाठी विरोध न करता सकारात्मकतेने विरोधाला दिलेले समर्थ उत्तर! त्यांनी हे विधान केले आणि नांदेडमध्ये जमलेल्या त्या हजारो सज्जनशक्तीने टाळ्यांचा गजर केला. तो गजर ‘समरसता साहित्य परिषदे’च्या २०व्या साहित्य संमेलनाच्या सर्वार्थाने धवल असलेल्या यशासाठी होता, तो गजर होता विरोधकांच्या धमक्यांना भीक न घालता हिमतीने संमेलन यशस्वी करणार्या नांदेडच्या सज्जनशक्तीसाठी, तसेच ‘समरसता परिषदे’च्या कार्यकर्त्यांसाठी!
असो. साहित्य संमेलन म्हटले की लेखक किंवा प्रकाशक काय त्यांचे ते बघून घेतील, असा ‘ट्रेंड’ गेली काही वर्षे आहे. त्यातच देशनिष्ठ कल्याणकारी वास्तवाविरोधात बोलायला या मंचाचा वापर होत असल्याचेही काही लोकांचे म्हणणे. अर्थात, हे म्हणणे त्यांचे त्यांचे वैयक्तिक असते. या सगळ्या परिप्रेक्ष्यात समाजाचे, समाजासाठी, समाजातल्या समाजनिष्ठ लोकांनी आयोजित केलेले साहित्य संमेलन असे या संमेलनाला म्हणता येईल. या संमेलनाचा प्राणबिंदू होता, या संमेलनातील मान्यवर वक्त्यांचे साहित्य आणि सामाजिक विचार अशा विविध विषयांवर या सर्व वक्त्यांनी विचार मांडले. ‘पद्मश्री’ नामदेव कांबळे यांचे अध्यक्षीय भाषण तसेच ‘समरसता साहित्य परिषदे’चे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे यांचे समारोपाचे भाषण, परिषदचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील यांचे मनोगत आणि डॉ. राजेंद्र नाईकवडे यांचे बीजभाषण, या सगळ्यांच्याच भाषणांनी ‘समरसता साहित्य परिषदे’चे साहित्य संमेलन खर्या अर्थाने समृद्ध झाले. ९० सालानंतरच्या साहित्याचे वास्तव, कारण आणि परिणाम यांचा वेध घेत दोन दिवस रंगलेल्या या साहित्य संमेलनात कवी आणि गझल कार्यक्रमांनी सुंदर रेशमी रंग भरले. संमेलन सर्वार्थाने श्रीमंतच होते. व्यासपीठाचे मान्यवर, महाराष्ट्रभरातून संमेलनाला येणारे विचारवंत आणि रसिक, तसेच साहित्यिक अगदी संमेलनात सहभागी होणार्या हजारो श्रोत्यांची यातायात व्यवस्था, निवास आणि भोजनव्यवस्था इतकी चोख होती की, या संमेलनामध्ये प्रत्येकाला आपण या संमेलनाचे प्रमुख अतिथीच आहोत, असे वाटत होते. संमेलनाच्या आयोजकांनी घरच्या मायेने प्रत्येकाची काळजी घेतली होती. आलिशान वाटावी, अशीच प्रत्येक व्यवस्था होती. संमेलनामध्ये पुस्तकांचे स्टॉलही होते. मात्र, इथे समाजात विद्ध्वंस पेरणारी पुस्तक नव्हती, तर समाजाला जोडणारी सकारात्मक विचार पेरणारी पुस्तके विक्रीला होती.
भव्यदिव्य संमेलनामध्ये एक वयोवृद्ध आजी दोन दिवस व्यासपीठावर डाव्या कोपर्यात उभ्या होत्या. आजी बसतही नव्हत्या. तो कोपराही त्या सोडत नव्हत्या. शेवटी नांदेडच्या संतोष कुलकर्णींना विचारले की, "त्या तिथे का उभ्या असतात? बसतही नाहीत.” तर ते म्हणाले, "त्या होय? त्या ‘संस्कार भारती’च्या कार्यकर्त्या आहेत. व्यासपीठावर दीपप्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार वगैरे त्यांनी जबाबदारी घेतली आहे. सर्व काही वेळेत आणि ठीक व्हावे, म्हणून त्या तिथे उभ्या राहतात. संमेलन सुरू झाल्यापासून खुर्ची दिलेली असूनही उभ्या राहिलेल्या त्या आजी संमेलन संपताच, शांतपणे आवराआवर करत स्टेजवरून खाली उतरल्या. घरचा समारंभ आटपावा आणि घरच्या ज्येष्ठ व्यक्तीने कृतकृत्य व्हावे, असेत्यांच्या चेहर्यावर भाव होते. आजींचे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात आहे. तसे तर हे संमेलन यशस्वी होण्यासाठी एकूण २७ समित्या बनल्या होत्या. त्यात १८० कार्यकर्ते गेले तीन महिने कार्यरत होते. जवळजवळ ४८ तासांत एकदाही झोपही न घेता, संमेलनाच्या यशस्वीतेसाठी काम करणारे हे कार्यकर्ते होते. कार्यकर्ता कसा असावा, हे या संमेलनात तन-मन-धन अर्पून सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना पाहून कळत होते. अर्थात, संमेलनाच्या सगळ्या व्यवस्था चोख होण्यासाठी कार्यवाह प्रसन्न पाटील यांच्यासह त्यांची पूर्ण टीम, तसेच प्रचारक निलेश गद्रे यांचे योगदान शब्दातीत आहे. समाज हे आपले घर आहे, घरात वैचारिक उत्सव सुरू आहे. त्यावेळी घरातले मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी किंवा काही घडले-बिघडले तर पूर्ववत आणण्यासाठी जसे उपस्थित असतात, तसेच ‘पद्मश्री’ दादा इदाते, ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, संमेलनाचे उद्घाटक, समरतेसाठी आयुष्य वेचलेले रमेश पांडव, रमेश महाजन उपस्थित होते. शांतपणे संमेलन पाहात होते. त्यांच्याही डोळ्यांत आनंद, अभिमान होता. कारण, जळगावमध्ये पहिले साहित्य संमेलन आयोजित करताना आणि पुढे या संमेलनातून समरसतेचा विचार समाजात पेरताना या आणि यांच्यासोबतच्या मान्यवरांनी हालअपेष्टा सहन केल्या हेात्या. कितीदा तरी निराशा पदरी आली असेल, अपमानही सहन करावा लागला असेल. पण, हेच ते मान्यवर होते, त्यांनी समरसतेचा गाडा पूर्ण समरस ताकदीने इथपर्यंत आणला होता.
या संमेलनाला नांदेडच्या पवित्र गुरूद्वाराचे बाबा सतनाम सिंग यांचा आशीर्वाद लाभला, तर स्थानिक आ. बालाजी कल्याणकरही उपस्थित होते. तसेच माजी अध्यक्ष अक्षयकुमार काळे, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, ज्ञानभारती विद्यामंदिरचे अध्यक्ष प्रा.बालाजी वाकोडे उपस्थित होते. संमेलनाला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाणा यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, संमेलनाला खा. अशोक चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत. कारण, त्यांच्या भगिनीचे निधन झाले, तर महाथेरो राहुल बोधी हे उपस्थित राहिले नाहीत. याबद्दल ‘समरसता परिषदे’चे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी स्पष्ट केले की, महाथेरो यांना समाज विघातक लोकांकडून धमक्या आल्या होत्या. त्यामुळे राहुल बोधी संमेलनात आले नाहीत. मात्र, यामुळे संमेलनात उपस्थित असलेल्या समाजात नाराजी पसरली. कारण एक तर हे संमेलन म्हणजे सर्व समाजाच्या वैचारिक, सांस्कृतिक समरसतेचे संमेलन होते. ’महाथेरो’ पदवी असलेल्या व्यक्तीने या संमेलनामध्ये येऊन ‘पद्मश्री’ नामदेव कांबळे यांना शुभेच्छा दिल्या असत्या, तर समाजात चांगला संदेश गेला असता. यावर भाष्य करताना डॉ. ईश्वर नंदापुरे म्हणाले, ”त्यांनी यायला हवे होते, इथे आम्ही काय विचार मांडतोय, ऐका तरी एकदा.” मात्र, याबाबत संमेलनाचे अध्यक्ष ‘पद्मश्री’ नामदेव कांबळे यांनी सविस्तर भूमिका मांडली. ”समाजाला जोडताना सज्जनशक्ती सोबत येईलच. पण कुणी सोबत येत नसेल, तर त्यांना त्यांच्या भूमिकेवर राहू दे. आपण समरस साहित्यनिर्मितीतून समरस समाज उभा करण्यास पुढे सरसावू”. ते म्हणाले,
काळ नसतो कुणाचा बांधिल
आपली वाट आपण चालत राहावे. त्यांचे म्हणणे खरेच होते. आपली वाट समाजाच्या समरसतेची आहे. त्या वाटेवर आपण चालत राहायचे. विघातक, फुटीरतावादी मुठभर आहेत, तर दुसरीकडे समाज, देशाचा उत्कर्ष साधणारी सज्जनशक्ती अगणित आहे. तिला सोबत घ्यायचे आणि समरसत साहित्यातून समरस समाजाचा विकास करायचाच, हा या संमेलनाचा संदेश होता.