सुनील कीटकरु यांना 'समरसता पुरस्कार'; ईशान्य भारतातील कार्याचा गौरव

    05-Aug-2025
Total Views |

नांदेड : बाल स्वयंसेवक म्हणून कार्याला सुरुवात करून अरुणाचल प्रदेशात सलग दहा वर्षे संघ प्रचारक म्हणून कार्य केलेले, आणि सध्या प्रज्ञा प्रवाहाचे पश्चिम क्षेत्र संयोजक असलेले लेखक सुनील कीटकरु यांना 'समरसता पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

नांदेड येथे दोन व तीन ऑगस्ट रोजी समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित २०व्या समरसता साहित्य संमेलनात कीटकरु यांचा गौरव करण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला. कीटकरु यांच्या "वार्ता ईशान्य भारताची" या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या वेळी बोलताना नामदेव कांबळे म्हणाले, "समाजातील गरीब, वंचित, शोषित घटकांसाठी न्यायहक्कासाठी लेखन, संवाद व परिषदेच्या माध्यमातून सुनीलजी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत." कार्यक्रमाला परमपूज्य संत बाबा बलविंदर सिंगजी, परिषद अध्यक्ष आयु डॉ.ईश्वर नंदापुरे, शिवा कांबळे यांच्यासह अनेक निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

अरुणाचल प्रदेशातील विविध जनजाती समाजांमध्ये प्रचारक म्हणून काम करत असताना आलेले अनुभव, समस्या आणि उपाय यांचे वास्तवचित्र या पुस्तकातून समोर येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे, तर आभार प्रदर्शन माणिक भोसले यांनी केले. या पुरस्कार सोहळ्याला नांदेडकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.