मुंबई : आरोग्य भारती कोकण प्रांताच्या वतीने आयोजित प्रांत अभ्यासवर्ग रविवार दि. ०३ ऑगस्ट रोजी राजा शिवाजी विद्यालय, दादर पूर्व येथे पार पडला. या एक दिवसीय अभ्यासवर्गात आरोग्य भारतीचे कोकण प्रांतातील ८१ कार्यकर्ते उपस्थित होते. या अभ्यासवर्गाला राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनुराधा नरवणे, अखिल भारतीय संघटन सचिव डॉ अशोक कुमार वार्ष्णेय यांची विशेष उपस्थिती होती.
एकूण ५ सत्रांमध्ये झालेल्या या अभ्यासवर्गात उद्घाटन सत्राला लक्ष्मीचंद चरला हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. कार्यक्षम आणि सशक्त राहण्यासाठी निरोगी असणे अत्यावश्यक आहे. याच संदर्भात त्यांनी स्वामी विवेकानंदांचे वचन "सामर्थ्य हेच जीवन आहे आणि दुर्बलता म्हणजेच मृत्यू" असे नमूद केले. या सत्रात अखिल भारतीय संघटन सचिव डॉ अशोक कुमार वार्ष्णेय यांनी आरोग्य भारतीची भूमिका स्पष्ट केली.
पुढे त्यांनी आरोग्य भारतीच्या देशभरात चालणाऱ्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच पुढील वाटचालीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची माहिती त्यांनी दिली. कोकण प्रांताचे अध्यक्ष श्री सुनील खन्ना ही उपस्थित होते.
शैक्षणिक सत्रांमध्ये अखिल भारतीय विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम टोळी सदस्य डॉ. मुकेश कसबेकर यांनी पंच परिवर्तनातील कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी विचार व त्यासोबत जल आणि स्वास्थ्य या विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलांमध्ये स्वास्थ्य जागृतीसाठी कसे प्रयत्न आपण करू शकतो या विषयी अखिल भारतीय सुप्रजा आयाम प्रमुख डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यासोबत महिला कार्य वाढवण्यासाठी व त्यांच्या कार्याला गती मिळण्यासाठी अखिल भारतीय महिला प्रमुख डॉ रिटा श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले.
योजनात्मक सत्रामध्ये प्रांत सचिव शेषराज कुरपटवार यांनी विभागश: योजना करण्यासाठी उद्बोधन केले.
समारोप सत्रात योगेशकृष्ण क्याल हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. "पहिले सुख - निरोगी शरीर" या सूक्तीचा उल्लेख करत त्यांनी योग आणि वनौषधींच्या उपयोगाला मधुमेह व इतर वाढत चाललेल्या रोगांवरील अमोघ उपाय म्हणून सांगितले. आरोग्य भारतीच्या कोकण प्रांतातील २४ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व या बैठकीत होते.