मुंबई : (Municipal Elections 2025) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.
राज्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
यावेळी ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार असून ४,९८२ मतदान केंद्रे आहेत. यासाठी ८,७०५ कंट्रोल युनिट्स लागणार असून, १७ हजार पेक्षा अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे” असे वाघमारे यांनी म्हटले.
निवडणूका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय
“या सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक होणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. साधारणता ही निवडणूक चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदान याद्या विभाजित केल्या जातील”, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
दिवाळीनंतर निवडणूका होण्याची शक्यता
“१ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील. कुठले मतदार निश्चित करायचे आणि कुठले काढून टाकायचे याचे अधिकार निवडणूक आयोगाला नाही. प्रभाग रचना २०११ पर्यंत झालेल्या जनगणनेनुसार झालेली आहे. ओबीसी आरक्षण सवलत पद्धत अवलंबली जाणार आहे. निवडणूक कधी लागेल हे आज सांगता येत नाही. मात्र, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे”, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नाही
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात येणार नाहीत. कारण व्हीव्हीपॅट वापरण्यात मोठा वेळ जातो. तसेच लोक देखील ईव्हीएमबाबत शंका घेतात. भविष्यात व्हीव्हीपॅटच्या प्रक्रियेत बदल झाला तर तसा बदल करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.
दरम्यान, सोमवारी ४ ऑगस्ट रोजी नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली होती. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आगामी निवडणूका नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह घोण्यास मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसार आणि २७ टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यात येणार आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\