डोंबिवली: ले टेसोर ऑफ फ्रेंच या मुंबईतील अग्रगण्य फ्रेंच शिक्षण संस्थेच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच फ्रेंच कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाने फ्रान्सची रंगतदार संस्कृती थेट डोंबिवलीत पोहोचवली आणि ५०० हून अधिक फ्रेंच भाषेचे प्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा जल्लोष या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
या कार्निव्हलमध्ये विविध रोचक स्टॉल्स, खेळ आणि फ्रेंच संस्कृतीची झलक अनुभवता आली. लहान मुलांनी मनमुराद खेळांचा आनंद घेतला, तर पालकांनी फ्रेंच भाषा शिकण्याची उत्सुकता दाखवली. हा संपूर्ण कार्यक्रम शिक्षण आणि आनंदाचा सुंदर संगम होता.
कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे डीईएलएफ (फ्रेंच भाषेतील अभ्यास प्रमाणपत्र) प्रमाणपत्र वितरण समारंभ होता. यामध्ये २१ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषेचे प्रमाणपत्र देण्यात आले, जे त्यांच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे प्रतीक ठरले.
या उपक्रमाचे आयोजन ले ट्रेसोर ऑफ़ फ्रेंच ची संस्थापिका शिवानी शाह यांनी केले होते. शिवानी या गेल्या १२ हुन अधिक वर्षांपासून फ्रेंच भाषा शिकवण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा उद्देश फक्त भाषा शिकवणे नसून, विद्यार्थ्यांना एक नवीन संस्कृती आणि दृष्टीकोन देणे आहे हा आहे.
हा कार्यक्रम डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, आणि येत्या काळात असेच अनेक भाषा-केंद्रित कार्यक्रम होतील अशी खात्री शिवानी शाह यांनी दिली.