मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे की, नाही याबद्दल उबाठाच्या पक्षप्रमुखांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मनोज जरांगे यांच्या गर्दीकडे बघून काही लोक स्वतःच्या विजयाचे आराखडे बांधत आहेत, अशी टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी केली.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "मराठा आरक्षणासंदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेतील उपसमितीची बैठक पार पडली. सकारात्मक मागण्यांचा विचार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. परंतू, अनेक लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी करत आहेत. काल उबाठा गटाच्या पक्षप्रमुखांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर बोलताना अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, असे सांगितले. पण त्याचवेळी ओबीसी समाजालासुद्धा त्यांची भूमिका कळली पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे की, नाही याबद्दल उबाठाच्या पक्षप्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. महाविकास आघाडीचे कोणतीही नेते याबाबत भूमिका स्पष्ट करत नाही. मनोज जरांगे यांनी या सर्व नेत्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. मनोज जरांगे यांच्याकडे जमलेल्या गर्दीवर अनेक लोक स्वत:च्या मतांचा आकडा ठरवत आहेत."
"उबाठा गटाचे काही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचा उल्लेख करतात. महायूती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज, मराठा समाजाची तीन हजार अधिसंख्य पदे, आंदोलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना नोकऱ्या, परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रत्येक जिल्ह्यात सारथी मार्फत वसतीगृह हे सगळे दिले आहे. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे," असेही त्यांनी सांगितले.
दुटप्पी भूमिका का?“केंद्र सरकारकडून घटनेमध्ये बदल करुन काही करायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार पुढाकार घेतील. पण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही, याचे उत्तर शरद पवार साहेबांनीसुद्धा दिले पाहिजे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देताना, मराठा समाज त्यामध्ये बसणार आहे का? बसवावा का? याचे उत्तर कुणीच देत नाही. सर्वजण राजकारण करत आहेत. मनोज जरांगे यांच्या गर्दीकडे बघून स्वतःच्या विजयाचे आराखडे बांधत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल तर तसे स्पष्ट करावे. दुटप्पी भूमिका का?” असा सवालही त्यांनी केला.
जरांगे यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नते पुढे म्हणाले की, “मराठा समजावर कोणताही अन्याय होता कामा नये. मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण मराठा समजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, ही आमची भूमिका आहे. मनोज जरांगे यांची सहानुभूती आपल्याला कशी मिळेल यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. कोणतेही आंदोलन झाले की, कुठला नेता आपल्या गळाला लागतो याचे प्रयत्न काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून केले जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंडल बचाव यात्रा म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. म्हणजे ते एकीकडे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढतात आणि दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करतात. त्यामुळे त्यांची खरी भूमिका काय? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.