मुंबई : मूठभर इंग्रजांनी भारतावर सत्ता गाजवण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा उपयोग करत शेकडो वर्षे इथल्या एकसंघ समाजावर राज्य केले. आज मविआतील मूठभर पक्ष याच कुटनीतीचा उपयोग करून गमावलेले मत आणि गेलेली पत मिळवण्याच्या प्रयत्नातून केवळ सरकारचीच नव्हे, तर मतांच्या राजकारणासाठी महाराष्ट्राची कोंडी करत आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी केली.
मराठा आरक्षणाबाबत विरोधकांच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केले. केशव उपाध्ये म्हणाले की, "सत्तेच्या हावरटपणापायी राज्याला वेठीस धरण्याचे विरोधकांचे भान आणि सोयरसुतक संपले आहे हेच यातून दिसते. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस. लोकशाहीत न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करायचा पूर्ण अधिकार आहे आणि सरकारही जरांगेशी सकारात्मक भावनेने संवाद साधत आहेच. एका समाजाचे आरक्षण काढून त्याला अस्वस्थ करत ते आरक्षण दुसऱ्या समाजाला देणे हे सामाजिक वीण अडचणीत आणण्यासारखे आहे. याऐवजी दुसऱ्या समाजाकरिता आरक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करणे आणि ते कायदेशीर बाबींवर टिकविणे हाच यावरचा मार्ग आहे. तोच मार्ग स्विकारून यूती सरकारने १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ केले आणि त्यानुसार आता भरती, प्रवेशही होत आहेत."
जरांगे यांच्या मागणीवर कुणाचीच ठाम भूमिका नाही"आता या निमित्ताने सरकार कसे अडचणीत येईल यासाठी दिवसरात्र मेहनत करताना दोन्ही समाजांनी आपापसात झुंजावे आणि मतांच्या लोण्याचा गोळा मात्र, आपल्या मुखात पडावा असा कट रचला जात आहे. शरद पवार यांचा पक्ष विदर्भात मंडल यात्रा सुरू करतो आणि त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी मागणी करतो. त्याचवेळी मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवतो. मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा संबोधणारे आणि मराठा आरक्षण ज्यांच्या ढिसाळ कारभारामुळे गेले, ते उध्दव ठाकरे आता मराठा समाजाबद्दल कळवळा दाखवत आहेत. ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या जरांगे यांच्या मागणीवर यातला एकही पक्ष ठाम भूमिका घेत नाही. केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असा वरवरचा दावा करून वेळ मारून नेतो. ही नीती महाराष्ट्राची सामाजिक समतेची वीण उसवणारी आहे. दुर्दैवाने तसे झालेच, तर त्याचे खापर मविआच्याच माथी मारले जाईल," असेही केशव उपाध्ये म्हणाले.