‘आपले विद्यालय आपला स्वाभिमान' संकल्प अभियान ; अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचा अनोखा उपक्रम

    30-Aug-2025   
Total Views |


मुंबई  : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने दि. १ सप्टेंबर रोजी ‘आपले विद्यालय आपला स्वाभिमान' हे संकल्प अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. देशातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे सर्वात मोठे राष्ट्रीय विचारांचे संघटन म्हणून देशभरात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची एक स्वतंत्र तयार झाली असून संघटनेच्या वतीने या अभियानात देशातील ५ लाखांहून अधिक शाळांचा सहभाग होत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन शैक्षिक महासंघ दरवर्षी राष्ट्रसमर्पित उद्देश लक्षात घेऊन विविध अभियान उपक्रम राबवत असते. यंदा शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाज यांना एकत्र आणून शाळेच्या उन्नतीसाठी संकल्प करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राष्ट्र समर्पित अभियानांतर्गत शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने संकल्प करणार आहे की, ते सर्वजण मिळून आपले विद्यालय स्वच्छ, शिस्तबद्ध, हिरवेगार आणि प्रेरणादायी ठेवतील. विद्यालयातील साधनसंपत्ती व वेळ यांना राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांचे जतन व विवेकी उपयोग करतील. विद्यालयात भेदभाव मुक्त वातावरण निर्माण करून सौहार्द व बंधुभावाने वागतील. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही; तर चारित्र्यनिर्मिती, आत्मविकास व समाजसेवा यांचे उत्तम साधन म्हणून वापर करतील. विद्यालय हे केवळ एक संस्था नसून संस्कार, सेवा व समर्पण यांचे मंदिर आहे, त्याचा गौरव वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश

शिक्षक व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी आयोजित या उपक्रमातून राज्यभरात एक प्रेरणादायी वातावरण निर्माण होईल, याचे समाधान आहे. शालेय स्तरावर शिक्षकांकडून अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांवर शाळेविषयी आत्मियता आणि अभिमान बाळगण्याचे संस्कार होत असतात. त्यामुळे बालमनाला घडवणारे शिक्षण आणि शाळा यांच्याशी विद्यार्थ्यांची नाळ शेवटपर्यंत जोडलेली असते. आपलं विद्यालय, आपला अभिमान उपक्रम विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त, परंपरा यांसारख्या उच्च मूल्यांची जाणीव करून देणारा तसेच विद्यार्थी व विद्यालय यांच्यातील नाते अधिक दृढ करणारा आहे. याअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता, शिस्तबद्धता व हरितमय वातावरण, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्यांचे पालन, पर्यावरणाचे जतन-संवर्धन यासाठी शिक्षक व विद्यार्थी सामूहीक संकल्प करणार आहेत. यालाच अनुसरून प्रश्नोत्तर स्पर्धा, चर्चासत्र, शालेय सभासदांचा सहभाग, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक सन्मान आदी उपक्रमांचे आयोजन केले जात आहे ही प्रशंसनीय बाब आहे. महांसघासोबतच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व समाजातील सर्व घटकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी होईल, अशी खात्री वाटते.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक