वर्तमानातील वास्तव साहित्यात उतरायला हवं! ; समरसता साहित्य संमलेनात मान्यवरांची प्रतिक्रिया

    03-Aug-2025   
Total Views |

नांदेड : " मराठी साहित्याचा विचार करायचा झाल्यास, नव्वदच्या दशकानंतर, सांस्कृतिक दृष्ट्या आपल्याला वेगवेगळी स्थित्यंतरं बघायला मिळाली. मात्र, वर्तमान काळात तसं होताना आपल्याला दिसत नाही, वर्तमानातील वास्तव मराठी साहित्यात उतरायला हवं " असं मत मान्यवरांनी व्यक्त केले. नांदेड येथे सुरू असलेल्या २० व्या समरसता साहित्य संमेलनातील " नवोदोत्तरी साहित्याचे बदलते रूप" या परिसंवादात ते बोलत होते.

दि. २ ऑगस्ट रोजी, नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंगजी साहित्यनगरी येथे २० वे समरसता साहित्य संमेलनाचा पहिला दिवस संपन्न झाला. उद्घाटन समारंभा नंतर येथे एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिसंवादाचा विषय " नवोदोत्तरी साहित्याचे बदलते रूप" हा होता, व या परिसंवादाचे अध्यक्ष सन जेष्ठ लेखक, प्राध्यापक अविनाश कोल्हे यांनी भूषवले. या परिसंवादअंतर्गत प्राध्यापक विजय राठोड यांनी " जागतिकीकरण आणि समाज परिणाम व समस्या " या विषयावर भाष्य केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " मोठ्या प्रमाणात आपल्या साहित्यावर, वाचन संस्कृतीवर पाश्चिमात्य गोष्टींचा प्रभाव जाणवतो. जागतिकीकरणाच्या लाटेनंतर मनुष्याचे झालेले यांत्रिकीकरण याचे सुद्धा दर्शन आपल्याला साहित्य विश्वात घडते." लेखक पृथ्वीराज तौर यांनी " नवोदोत्तरी साहित्यात दिसणारे औद्योगीकरण, महानगरीय जाणिवा " यावर भाष्य केले. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " ज्या प्रकारे आपले कवी साहित्यिक औद्योगीकरणानंतर आलेल्या विफलतेचे चित्रण करतात त्याच प्रकारे त्यांनी या तंत्रज्ञानाच्या विकासाची दुसरी बाजू ज्यामुळे उद्यमशीलतेचा विकास झाला, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. राजेश कापसे यांनी " नवे विषय नवी मांडणी नवी संवेदना" या विषयावर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की मराठी साहित्य विषयांमध्ये असणारी संस्कृतिक विविधता हे तिचे बलस्थान आहे. येणाऱ्या काळात हे बलस्थान टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. आपले मनोगत व्यक्त करताना अविनाश कोल्हे म्हणाले की " आत्ताच्या घडीला साहित्याच्या गुणवत्तेवर काम करणं जास्त गरजेचं आहे, पूर्वी ज्या प्रकारे लिखाणावर संपादकीय संस्कार होत असत, तसे आता सोशल मीडियाच्या काळात दिसून येत नाही. लेखकाला घडवण्यासाठी, त्याच्या लिखाणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे."

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.