मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. तर उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवण्याचे काम केले, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवनाथ बन म्हणाले की, "औरंगजेब फॅन क्लब प्रवक्ते संजय राऊत हे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले. संजय राऊत यांनी सामनामध्ये संपादक असताना मराठा बांधवांच्या मोर्चाला ‘मुका मोर्चा' म्हटले होते. ते आज मराठा आरक्षणावर बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेले. त्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला."
"आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवण्याचे काम केले. त्यामुळे संजय राऊत यांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी सातत्याने सामनामध्ये मराठा बांधवांचा अपमान केला. त्यांनी आधी मराठा समाजाची माफी मागावी आणि मगच त्यांच्याबद्दल बोलावे. इतर एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यांनी शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला १४ टक्के आरक्षण दिले होते," असेही त्यांनी सांगितले.
आता लाडका भाऊ आठवलामनसे-उबाठा गटाबाबत बोलताना ते म्हणाले की, “तुम्हाला लाडका भाऊ आज आठवला. २०१४ आणि २०१९ ला राज ठाकरेंनी हात पुढे केला, पण तुम्ही त्यांच्यासोबत गेला नाहीत. मात्र, आता जनतेने घरी बसवल्यानंतर आपला भाऊ आठवतो आहे," असे म्हणत नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.