अमेरिकेत शालेय विद्यार्थ्यांवर पुन्हा गोळीबार - दोघांचा मृत्यू, तर १७ जखमी, हल्लेखोराची आत्महत्या

    29-Aug-2025
Total Views |

वॉशिंग्टन,
अमेरिकेतील गोळीबारांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, बुधवार, दि.२७ ऑगस्ट रोजी मिनियापोलिस चर्चमधील या दुर्देवी घटनेत शाळकरी मुलांना लक्ष्य करण्यात आले. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्या केल्याची माहिती आहे.

शाळेचे नवे सत्र सुरु होत असल्याने या चर्चमध्ये सेवेसाठी हे विद्यार्थी एकत्र जमले होते. २३ वर्षीय रॉबीन वेस्टमन याने अॅन्युन्सिएशन कॅथोलिक स्कूलच्या चर्चच्या बाजूच्या खिडयांमधून गोळीबार केला. या गोळीबारानंतर वेस्टमन याने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

या गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली. या तपासणीमध्ये पोलिसांनी स्मोक बॉम्बही मिळाला असून, स्फोटके आढळून आली नाहीत. या हल्ल्याच्यावेळी बराच काळ गोळीबार सुरु होता. मात्र, त्यात गोळीबारापेक्षाही काही अधिक असल्याची शंका प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. तसेच, हल्ल्यातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनीही त्यांचे अनुभव स्थानिक माध्यमांसमोर मांडले.

दरम्यान, वेस्टमन हाच हल्लेखोर असण्याच्या शक्यतेला एफबीआय प्रमुख काश पटेल यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, वेस्टमन याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसून, नैराश्य, वंशवाद अशा अनेक समस्यांनी वेस्टमनला ग्रासले होते. वेस्टमनची आई अॅन्युन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्येच शिक्षिका असल्याचे आता तपासांती समोर आले आहे. पोलीस अजूनही या घटनेचा तपास करत आहेत.

अमेरिकेतील बंदुकीच्या स्वैरवापराचे बळी


अमेरिकेमध्ये चालू वर्षात विद्यार्थ्यांवरील गोळीबाराच्या एकूण २४५ घटना घडल्या आहेत. २०२४ मध्ये या घटनांची संख्या ४४८ होती. त्याआधी २०२१ ते २०२३ मध्ये अशा गोळीबारांची संख्या वर्षाला सरासरी ६०० पेक्षा जास्त नोंदवली गेली होती. बंदुकीच्या स्वैरवापरामुळे होणार्या हत्यांचे प्रमाण अमेरिकेमध्ये ८०.५ टक्के असून, इंग्लंडमध्ये हेच प्रमाण चार टक्के आहे, तर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनुक्रमे ४० टक्के आणि ११ टक्के आहे.