काँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ; एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे योग्य नाही

    29-Aug-2025   
Total Views |

नागपूर : एकीकडे राहुल गांधी ओबीसी आरक्षणावरून राजकारण करतात. तर दुसरीकडे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेला समर्थन देतात. त्यामुळे सर्वात आधी काँग्रेसने त्यांची नेमकी भूमिका काय, ते स्पष्ट करावे, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. राहुल गांधी ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहावे, अशी भूमिका घेतात. पण विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ या संपूर्ण टीमच्या मनात नेमके काय आहे? ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे यामुळे सामाजिक संतूलन बिघडेल. त्यामुळे त्या समाजांचे आरक्षण कायम ठेवून नवीन मागणीवर वेगळा विचार केला पाहिजे. राहुल गांधी ओबीसींच्या आरक्षणवरून राजकारण करतात. तर दुसरीकडे, त्यांचे नेते ओबीसींच्या १८ पगड जातींचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याच्या भूमिकेला समर्थन करत आहेत. त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे."


चार दिवस उशीरा आंदोलन करता आले असते

"आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यासाठी कुणाची ना नाही. परंतू, हिंदूंच्या महत्वाच्या सणाच्या काळात मंबईची आणि राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चार दिवस उशीरा आंदोलन करता आले असते, एवढेच सरकारचे म्हणणे होते. सरकारने आता परवानगी दिली असून आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्या मान्य करत आहेत. परंतू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ च्या काळात मराठा समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीसुद्धा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतू, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही त्यांची मूळ मागणी आहे. सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय केला. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही," असेही ते म्हणाले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....