शहापूरमध्ये भाजपाचा झंझावात, शिवसेना, राष्ट्रवादी, उबाठाला धक्का ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश

    26-Aug-2025
Total Views |

शहापूर, शहापूर तालुक्यात भाजपामध्ये पक्षप्रवेशाची मालिका सुरूच असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार, शिवसेना-उबाठा आणि कॉंग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये ४ माजी पंचायत समिती सदस्य, १२ सरपंच, ८ माजी सरपंच आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून गेल्या दोन ते तीन महिन्यात भिवंडी तालुक्यातील विविध भागातील इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. शहापूर तालुक्यातही कार्यकर्त्यांमागे संघटनात्मक ताकद उभी केली जात आहे. त्यातून भाजपामध्ये पक्षप्रवेश होत आहेत.

शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी शहापूरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची बैठक असल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा शहापूर दौरा रद्द झाला. त्यामुळे शहापूरमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, शहापूरचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, गणेश राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवसेनेच्या शहापूर तालुका आदिवासी आघाडीचे प्रमुख संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ भला, दत्ता हंबीर, संदीप थोराड, सरपंच भास्कर आरे, अंकुश बरतड, किसन भांगे, तुकाराम वाघ, अमित हरड, बळीराम सातपुते आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला.

शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागातील ग्रामस्थांच्या विकासाच्या अपेक्षा महायुतीच्या सरकारकडून पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या आदिवासी समाजासाठीच्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवाव्यात, असे आवाहन केले. तसेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना ताकद देण्याची ग्वाही दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीत दुहेरी संख्या गाठणार

जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत शहापूर तालुक्यातून भाजपा दुहेरी संख्या गाठेल, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केला.