समरसतेची समाज‘लता’

    26-Aug-2025   
Total Views |

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रत्येक समस्येवर मात करत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या जळगावच्या प्राचार्य . डॉ. लता मोरे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...


शीचे दशक होते. उन्हाळ्याचे दिवस. त्यातच तो जळगावचा तीव्र उन्हाळा. अनवाणी पायाने ती पोरं जंगलात लाकडे गोळा करून मोळी बनवण्यासाठी गेली होती. तिला तहान लागली. तहानेने घसा कोरडा पडला. डोळ्यांसमोर अंधारी आली. ती तशीच चालत गावात आली. एका घरासमोर मोळी टाकली. ती पाणी मागणार, इतयात घराच्या मालकिणीने तिला ओंजळभर धान्य दुरूनच दिले आणि ती घरात निघून गेली. तिला स्पर्श केला असता, तर त्या बाटल्या असत्या, असा मालकिणीचा आविर्भाव होता. त्या तहानलेल्या मुलीची पाणी मागण्याची हिंमतच झाली नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गरिबी आणि जातीयता यांमुळे माणूस ‘माणुसकी’ कसा विसरू शकतो? तिने रात्री हे दुःख तिच्या बाबांना सांगितले. बाबा म्हणाले, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांनासुद्धा सहन करावं लागलं होतं. डॉ. बाबासाहेबांनी काय कमी सहन केलं? पण ते मनात ठेवून ते कुढत राहिले का? नाही. उलट, त्यांनी विचार आणि कर्तृत्वातून जगाला मार्ग दाखवला. आपले संपूर्ण जीवन दीन दलित समाजाच्या उत्थानासाठी वाहिले! बाबासाहेबांचा हाच वसा आपल्याला पुढे नेण्यासाठी लढायचय! बेटा, हे दिवसही जातील. त्या क्षणी त्या मुलीने ठरवले की, हे दिवस बदलायलाच हवेत. आपण शिकायचे. ती मुलगी म्हणजे आजच्या प्राचार्य . डॉ. लता मोरे. डॉ. लता एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि ‘पीएचडी’च्या मार्गदर्शिका आहेत. आजपर्यंत त्यांचे शिक्षणशास्त्र, भावनिक बुद्धिमत्ता, बहुविध बुद्धिमत्ता, तंंत्रज्ञान आणि शिक्षण, शिक्षणामधील नवनवीन प्रवाह वगैरे विषयांचे ६२ प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ‘बीए’, ‘एमए’, ‘बीएड’, ‘एमएड’ वगैरे शिक्षणासाठी संदर्भपुस्तके म्हणून त्यांची एकूण १३ पुुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या ‘भारतीय शिक्षण मंडळ’ देवगिरी प्रांताच्या सहमंत्री आहेत. उत्तर महाराष्ट्रात निस्वार्थी समाजसेवक तसेच शिक्षण क्षेत्रातील विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे.

लता यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. लता यांचे माहेर जळगावचे तोरणाळे गाव. एकनाथ आणि गुंफाबाई सुरवाडे यांना पाच अपत्ये. त्यांपैकी एक लता. एकनाथ आणि गुंफाबाई मजुरी करत. लहानगी लताही त्यांना मदत करत. कष्ट करून स्वाभिमानची भाकरी खाणारे सुरवाडे कुटुंब. गरिबी होती, गरिबीमुळे येणारे सगळेच प्रश्न होते. मात्र, सज्जनता, पापभिरू वृत्ती आणि मुख्यतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर असलेली निष्ठा, यामुळे सुरवाडे कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती परिस्थितीवर मात करत जगत होती. तोरणाळे तसे छोटे खेडेगाव. तिथे मुलींना सातवीच्या पुढे शिकवणे म्हणजे काळाच्या खूप पुढे जाणे. मात्र, एकनाथ यांनी मुलांना शिकवण्याचे ठरवले. त्यांनी लता यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्याकाळी लता यांचा दिनक्रम कसा होता, तर पहाटे उठायचे, गायी-म्हशींचे शेण-गोठा करायचे. दोन तास चालत जाऊन डोयावर दोन आणि काखेत एक असे तीन हंडे पाणी आणायचे. मग शाळेत जायचे. शाळेतून आले की वडिलांना रस्ता बनवण्याच्या मजुरी कामामध्ये मदत करायची. बरं, दहावीपर्यंत त्यांना चप्पल काय असते, ते माहीत नव्हते. लता यांनी सातवी उत्तीर्ण केली आणि त्यांचे सुदैव की गावात माध्यमिक शाळा आली. त्या गावातल्या पहिल्या दहावीच्या बॅचला ४० जण होते. मात्र, त्यामधून एकट्या लताच दहावी उत्तीर्ण झाल्या. नातेवाईकांनी म्हटले, लेकीला इतके शिकवून कसे चालेल? डोयावर बसेल. पण, शाळेतले शिक्षक घरी आले; त्यांनी सुरवाडे दाम्पत्याला सांगितलं की, तुमची लेक हुशार आहे. शिकू द्या तिला. बाबांना आनंद झाला, पण आजीने अट घातली, नात कालीजात जाईन, पण अंगभर साडी घालून अन् डोईवर पदर घेऊन! तरच तिला कालीजला पाठवीन. लता यांना शिक्षण घेणे महत्त्वाचे होते. त्यांनी आजीची अट मान्य केली. बारावी झाल्यानंतर त्यांचा विवाह सुभाष मोरे या अत्यंत सज्जन व्यक्तीशी झाला. लता यांना वाटे की आपण शिक्षण पूर्ण करून नोकरी करावी; संसाराला हातभार लावावा. त्यातूनच पुढे सुभाष यांच्या सहकार्याने लता यांनी शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, त्यांना दोन अपत्ये झाली. घरदार सांभाळून त्यांनी ‘एमए’ इंग्लिश, ‘बीएड’, ‘एमएड’, ‘डिप्लोमा इन स्कुल मॅनेजमेंट’ करीत ‘सेट’ परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. इंग्लिश कम्युनिकेशन स्किल फॉर स्टुडंट’ या विषयात त्यांनी ‘पीएचडी’ही केली.

त्यांना नवापूर येथे महाविद्यालयात नोकरीही मिळाली. त्या काळात त्यांनी परिसरातली आदिवासींच्या उत्थानासाठी स्वतःचे जीवन वाहून घेतले. पुढे त्यांना प्राचार्य म्हणून एका महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. आर्थिक तसेच सामाजिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी त्यांनी काम सुरू केले. याच काळात त्यांचा संपर्क सामाजिक समरसतेचे कार्य करणार्या निलेश गद्रे यांच्याशी झाला. सामाजिक समरतेसाठी लता सर्वच स्तरांवर काम करू लागल्या. ‘समता सोडून समरसता का,’ असे काही लोक त्यांना विचारतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समाजकार्य हे . संघाचे काम आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. असो. लता यांना महिला सक्षमीकरणासाठी आयुष्यभर काम करायचे आहे. जंगलात घोटभर पाण्यासाठी तळमळणारी ती पोर आज समाजाच्या उत्थानासाठी आशेचा सागर बनली आहे!


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.