गणेश सजावटीची ‘माटी’

    25-Aug-2025
Total Views |

गणेशोत्सवाचा सण म्हटला, तर कोकण आपसूकच डोळ्यांसमोर तरळते. गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक सजावटीच्या जनजागृतीला आता कुठे सुरुवात झालेली असतानाच, तळकोकणातील लोकांनी पर्यावरणपूरक सजावटीची कास परंपरेतूनच धरली आहे. ‘माटी’ या स्वरुपात धरलेली ही कास नेमकी या आहे, याविषयी या लेखातून जाणून घेऊया...


‘माटी’ म्हणजे गणेशोत्सवात गणेशाच्या आसनावर रानबहर सजवून केलेली पर्यावरणपूरक सजावट. तळकोकणात माटी, माटवी, मंडपी, तर गोव्यात माटोळी म्हणून ओळखली ही परंपरा फक्त तळकोकण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग, सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवारपर्यंतच मर्यादित दिसून येते.

‘माटी’ म्हणजे लाकडाची आयताकृती, उभ्या-आडव्या पट्ट्यांनी रचलेली चौकट. सागवान किंवा फणसाच्या लाकडापासून ही कायमस्वरूपी चौकट केलेली असते. पूर्वी ही चौकट बांबू किंवा भेडला माडाच्या काठ्यांपासून तयार केली जायची. या चौकटीवर परिसरात आढळणार्या वेगवेगळ्या वनस्पतींची पाने, फुले व फळे बांधून आरास केली जाते.

‘माटी’चा मुख्य भाग म्हणजे आंब्याचे टाळे (टहाळे), नारळ, सुपारीचा शिपटा/कातरो आणि तवसा/काकडीची मोठी जात. गोव्यात या काळात मिळणारी चिबुड, भोपळा, तोरींजन व इतर फळे तसेच केळीचा घड व नारळाची पेंडदेखील ‘माटी’ला बांधतात. काही ठिकाणी परसबागेत घेतलेल्या दोडकी, पडवळ, भेंडी, वाली, वांगी अशा फळभाज्यादेखील ‘माटी’ला बांधतात. सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी फळेदेखील ‘माटी’ला बांधण्याची पद्धत आहे.

याशिवाय, प्रदेशानुसार आढळणार्या विविध रानफूल-फळांनी ‘माटी’ सजवली जाते. यातील काही वनस्पती म्हणजे :

रानबहार ‘माटी’ला बांधण्यामागचे शास्त्र शोधायचे म्हटले, तर या सर्व वनस्पती खूप औषधी असतात. ‘माटी’च्या माध्यमातून यांची जनमानसांत ओळख होते आणि ‘माटी’च्या उपयोगी म्हणून संवर्धनही केले जाते. अजून एक गोष्ट म्हणजे, या रानबहाराचा गंध-दरवळदेखील आरोग्यदायक असावा. त्यामुळे ‘माटी’ बांधल्यानंतर घर प्रसन्न होऊन जाते. हेदेखील माटी सजवण्याचे कारण असावे.

‘माटी’ला न्हेवर्याचा/करंज्यांचा नवस बोलण्याचीही पद्धत आहे. एखादे कार्य पूर्ण व्हावे, म्हणून नवस बोलला जातो आणि पूर्ण झाले की ‘माटी’ बांधताना करंज्या दोर्यात ओवून बांधल्या जायच्या. पहिल्या दिवशी रात्री भजन-आरती झाल्यावर करंज्यांचा नैवेद्य ठेवतात आणि गार्हाणे घालून कार्य पूर्ण झाल्याबद्दल आभार मानून ‘माटी’ला बांधलेल्या करंज्या प्रसाद म्हणून वाटल्या जातात.

‘माटी’ ही गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बांधली जाते व गणेश विसर्जनापर्यंत तशीच ठेवली जाते. विसर्जनावेळी ‘माटी’ला बांधलेला नारळ फोडून त्याच्या पाण्याने गणेशाचा अभिषेक केला जातो आणि या नारळापासून तयार केलेली ‘शिरनी’ म्हणजे नारळाच्या कातळीचे तुकडे आणि ‘माटी’ला बांधलेली इतर फळे प्रसाद म्हणून वाटली जातात.

अशी ही ‘माटी’ची पर्यावरणपूरक परंपरा. परंपरांच्या मागे शास्त्रीय कारणे असतात. ती आपल्याला कळत नसल्याने आपण त्या स्वीकारत नाही किंवा चुकीच्या ठरवतो. पण अशा परंपरांचा सखोल अभ्यास करून त्या जपल्या पाहिजेत. सध्या ‘माटी’ व गणेश सजावटीत वाढलेला प्लास्टिकचा वापर व बाजारीकरणामुळे ‘माटी’साठी लागणार्या वनस्पतींचा होणारा ओरबाडा हे चिंतेचे विषय आहेत. प्लास्टिक किंवा

थर्माकोलच्या पर्यावरणघातक सजावटीऐवजी ‘माटी’ किंवा ‘माटी’सारख्या पर्यावरणपूरक सजावट केली जावी, ही काळाची गरज आहे. मात्र, हेही लक्षात ठेवावं की निसर्गाचा ओरबाडा होणार नाही; ‘माटी’त वापरली जाणारी फळे ही परिपक्व असावी, म्हणजे त्यातून बीजप्रसारही होईल. या झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे अशा झाडांचे संवर्धन करणेही फार गरजेचे होत आहे.

किवनीचे दोर - जंगलात आढळणारे मध्यम आकाराचे झुडूप. याच्या पिळदार शेंगा म्हणजे मुरुडशेंग बाळगुटीतील एक औषध. याच्या सालींचा वापर ‘माटी’ बांधण्यासाठी दोर म्हणून करतात.

हरण/सोनकी -  सड्यांवर मोठ्या प्रमाणात वाढणारी वर्षायू वनस्पती. हिची पिवळी फुले ‘माटी’त शोभून दिसतात.

कौंडाळ/कवंडळ -  इतर झाडांवर वाढणारा मोठा काष्टिय वेल. याची लालभडक गोलाकार फळे ‘माटी’त अचूक दिसून येतात.

कांगले/कांगुणी - सड्यावर किंवा उतारावर आढळणारा काष्टिय वेल. जोतिष्मती म्हणून आयुर्वेदिक औषधात वापरतात. फुटल्यावर केसरी दिसणारी फळे ‘माटी’त लक्षवेधी ठरतात.

शेरवाड/सरवड - जंगलात वेलीसारखे वाढणारे झुडूप. याला येणारी पिवळी फुले व त्याभोवतीची शुभ निदल ‘माटी’त उठून दिसतात.

तिरडो/तेरडा - सड्यावर, परसात किंवा पडीक जमिनीवर सहज वाढणारी वर्षायू वनस्पती. याची गुलाबी फुले ‘माटी’त वेगळा रंग भरतात.

खड्यानाग/कळलावी/अग्निशिखा - पावसाळ्यात वाढणारी कंद वर्गीय वेल. याचा कंद विषारी तसेच औषधी आहे. याची आगीसारखी दिसणारी लाल-पिवळी फुले ‘माटी’त शोभून दिसतात.

नांगरकुडा/नागकुडा - जंगलात आढळणारा लहान वृक्ष. याची पाळेमुळे स्थानिक औषधींमध्ये वापरतात. याची चोचीसारखी दिसणारी पिवळी फळे ‘माटी’ला बांधतात. ती फुटल्यावर आतील लाल बिया आकर्षक दिसतात.

नरमाची फळे - मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष. काही ठिकाणी याची गोलाकार फळे ‘माटी’ला बांधतात.

घागऱ्य - जंगलात आढळणारी काष्टिय वेल. गोव्यात याची शिंपल्यासारखी दिसणारी केशरी फळे ‘माटी’ला बांधतात.

नितीन कवठणकर
(लेखक तळकोकणात वन्यजीव अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत.)