मुंबई, "मनीष तपासे यांच्या सारख्या कवींच्या कविता इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा अनुवादित झाल्या पाहिजे. अनुवाद ही काळाची गरज असून मराठी साहित्याने भाषांच्या सीमा ओलांडत भगिनीभाव जपला पाहिजे. साहित्याने गटातटाचे प्रतिनिधीत्व न करता माउलींचा विश्वबंधुत्वाचा विचार रुजवायला हवा. " असे प्रतिपादन ज्येष्ठ प्राध्यापक नरेंद्र पाठक यांनी केले. अस्वस्थ मनाच्या किनाऱ्यावर या मनीष तपासे यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
दि. २३ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलय येथे कवी मनीष तपासे यांच्या 'अस्वस्थ मनाच्या किनाऱ्यावर' या सृजनसंवाद प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन पार पडले. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रा. डाॅ. गंगाधर अहिरे, प्रा. सुजाता राऊत, कवी, संपादक गीतेश शिंदे उपस्थित होते. यावेळी मनीष तपासे यांच्या काव्यसंग्रहावर भाष्य करताना प्रा. डॉ. नरेंद्र पाठक म्हणाले की मनीष यांच्या कवितांमध्ये सामाजिक, कौटुंबिक, प्रेम, विरह, कॉर्पोरेट जगत अशा अनेक भावनांचे प्रतिबिंब दिसते. या संग्रहाची निर्मिती उत्तम असून गीतेश यांनी संपादक म्हणून एक दर्जेदार कलाकृती वाचकांच्या हाती सोपावली आहे. कवी संजय चौधरी यांनी मनीषच्या कवितेचा प्रवास उलगडताना इतर कवींच्या कवितांचे दाखले दिले. ही कविता आतून आलेली अस्सल कविता असल्याचे सांगत त्यात माणूस केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. गंगाधर अहिरे यांनी तपासे यांचे भावविश्व उलगडून दाखवले. ते म्हणाले, कवितेची पहिली ओळ सुचणे अतिशय महत्त्वाचे असते; त्यानंतर कारागिरी असली तरी तीही कुशलतेने करता यायला हवी. त्यासाठी कवीने आपल्या कवितेवर मेहनत घ्यायला हवी व समकालातील इतर साहित्यही वाचायला हवे. कवीने नेहमीच समाजाला आरसा दाखवण्याचे काम करायला हवे.
कवी, संपादक गीतेश शिंदे यांनी संग्रहाच्या निर्मितीविषयी भाष्य करताना कवितेतील सामाजिक जाणिवा, प्रेमभाव, नातेसंबंधांमधील हरवलेपण याबद्दल दाखले दिले. कॉर्पोरेट जगतात अडकलेल्यांचे प्रतिनिधित्व या कविता करत असून कवीने जागतिकीकरणाच्या चक्रात पिचलेल्यांच्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिल्याचे सांगितले. प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या आजचे युग अस्वस्थतेचे असून मनीष यांची कविता आजच्या युगधर्माची कविता आहे. ही कविता मुक्तछंदात्मक असली तरी त्यात यमकाचा प्रभावी वापर आहे. कवी तपासे यांनी मनोगतात कॉर्पोरेट जगतात वावरताना कविता तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपल्याचे सांगत जगण्याच्या अपरिहार्यतेतून या कविता उतरल्याचे सांगितले. त्यांनी 'स्क्वेअर फिट' या कवितेचे सादरीकरणही केले.