"मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार!"; आमदार अमित साटम यांचा निर्धार!

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई : (Ameet Satam Mumbai Bjp New President) "मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडून मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकावला जाईल आणि महायुतीचा महापौर निवडून आणला जाईल", असे प्रतिपादन नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सोमवारी केले आहे. 

नेमकं काय म्हणाले अमित साटम?

“गेल्या ११ वर्षात मुंबई शहराचा कायापालट, मुंबईत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला, त्याचा रिझल्ट मुंबईकरांना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या ११ वर्षात काम केलय तसाच विकास, उन्नती आणि प्रगती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असं मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले. “मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरिता, मुंबईकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कठोर प्रयत्न करु. येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्यासाठी कटिबद्ध आहोत” असं अमित साटम यांनी सांगितले.

“आपण गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत कुठल्या उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये इकबाल मुसा या बॉबस्फोटाच्या आरोपीला फिरताना पाहिलय, कुठल्या उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तानी झेंडे फडकलेले आहेत ते आपण पाहिले. मतांच्या राजकारणासाठी काही लोक मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करु पाहतायत. वर्सोवा पॅटर्न विधानसभा निवडणुकीत पाहिला, तशाच प्रकारचा पॅटर्न संपूर्ण मुंबईत लागू करण्याचा प्रयत्न कोण करतंय? अशा प्रकारचा मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. मुंबईचा विकास आणि सुरक्षा याची हमी आम्ही देतो” असं अमित साटम म्हणाले.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून मुंबईत पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू झाले व ते पूर्णत्वास जात आहेत. यामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीसीटीव्ही देखरेख या प्रकल्पांचा समावेश आहे. शहरातील २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे देण्यासाठी गृहनिर्माण सुधारणांचाही समावेश आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिवर्तनाच्या मार्गावर आहे अणि ते पुढे नेण्याचे काम आम्ही करू", असे साटम यांनी सांगितले.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\