अथर्व सुदामे अडकला वादाच्या भोवऱ्यात! गणेशोत्सवाशी संबंधित केलेल्या रील प्रकरणी हिंदूंकडून संताप

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई : लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेली एक रील सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्या रीलमधील मजकूरामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने तो व्हिडिओ कालांतराने डिलिटही करण्यात आला. या प्रकरणी अथर्वने सोशल मिडियावरून माफी मागितली असली तरी सुदामे विरोधात समाजातून प्रचंड संताप व्यक्त होताना दिसतोय.

संबंधित रीलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतो आहे. तो एका मूर्तीकाराकडे गणपतीची मूर्ती घेण्यासाठी जातो. तेव्हाच एक मुलगा येतो आणि त्या मूर्तीकारास म्हणतो, "अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा हैं" तेव्हा मुर्तीकार मुस्लिम असल्याचे स्पष्ट होते. मूर्तीकार आदराने त्यास सांगतो की, तुम्ही दुसऱ्या दुकानात गेलात तरी हरकत नाही. त्यावर अथर्व सुदामे म्हणतो, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुर्माही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील." व्हिडिओच्या या आशयामुळे अथर्व सुदामेवर जोरदार टीका होताना दिसतेय.

संबंधित व्हिडिओ अथर्व सुदामे यांने आपल्या सोशल मिडियावरून डिलिट केला असून त्याने याबाबत माफी मागत स्पष्टीकरण दिले. आपला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसेच मराठी कॉन्टेट क्रिएटरमध्ये आपणच सर्वांपेक्षा जास्त संस्कृती आणि सणांवर रिल्स केल्याचे त्याने यामध्ये म्हटले आहे.

प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवावे

समाजात ज्यांना प्रतिष्ठा आहे किंवा ज्यांचे विचार लोक आत्मसात करत असतात अशा सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवायला पाहिजे. आपण लोकप्रिय असलो, तरी आपल्या कोणत्याही कृतीतून आपल्या धर्माचे तसेच संस्कृतीची अवहेलना किंवा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. देवी-देवता, धार्मिक विधी यांसारख्या अगदी गाभा असलेल्या विषयांत आपण अन्य धर्मांशी कोणतीही तडजोड करु शकत नाही. समाजातल्या सर्वच प्रभावकांनी यापुढे धार्मिक गोष्टींच्या बाबतीत सावध राहून काळजी घेतली पाहीजे.

- आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी

कलाकाराला कुठलाही धर्म नसतो

वास्तविक कलाकाराला कुठलाही धर्म नसतो. मग तो मुर्तीकार, चित्रकार किंवा शिल्पकार असेल, त्याला जो छंद आहे तो जोपासत त्यातून त्याचा उदरनिर्वाह होत असेल, चूकीचे काय. तो केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचा भाग आहे, आस्थेचा भाग नाही. त्याला धर्माची जोड दिली तर आयुष्यभर हा वादच राहणार. जर अशा व्हिडिओतून आदराची भावना निर्माण होत असेल, तर त्याला तडा पाडून चालणार नाही.

- आबीद अली यासिन चौधरी, राष्ट्रीय सहप्रभारी, सूफ़ी संवाद महाअभियान, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा

सनातन धर्माचे पालन आपली जबाबदारी

अथर्व सुदामे याने माफी मागितली हे ठीक आहे, परंतु 'सर्व धर्म समभाव' ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. ज्या धर्मामध्ये मुळात मूर्तीपूजा हराम आहे, ज्यांच्यासाठी हिंदूंच्या देव-देवता सैतान आहेत आणि ज्यांना हिंदू धर्माबाबत काडीमात्र आस्था नाही, अशांनी हिंदू धर्माशी संबंधित व्यवसाय किंवा व्यापार करूच नये. सनातन धर्माचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. इथून पुढे चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. हिंदू बांधवांनी सुद्धा वस्तू खरेदी करताना 'ओम सर्टिफिकेट' प्रमाणित आहे की नाही, हे तपासून घ्यावे.

- महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक