शाश्वत जीवनाचा मंत्र म्हणजे गणेशोत्सव!

    24-Aug-2025   
Total Views |

गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा सोहळा! गणरायाच्या आगमनामुळे सध्या सगळीकडे उत्साहाचे वातावरण आपल्याला अनुभवयाला मिळते. एकीकडे पर्यावरणपूरक मखर सजावटीचा विचार काहींनी सुरू केला आहे, तर दुसरीकडे खाद्यपदार्थांची लगबग परंतु, गणेशोत्सवामागचा शास्त्रविचार नेमका काय? आताच्या पिढीसाठी गणेशोत्सवाचे महत्त्व काय? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची घेतलेली विशेष मुलाखत.


आजच्या युवकांसाठी गणेशोत्सव म्हणजे नेमके काय?
गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला हवे, म्हणून गणेशपूजा करायला हवी. आता हे गुण कोणते, तर गणपती म्हणजे १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे असे आपण म्हणतो. त्यातील एक कला आणि एक विद्या जरी आपण आत्मसात केली, तरी आपले जीवन समृद्ध होईल. गणनायक म्हणजे काय तर, आपल्याला नेतृत्वाचा विचार करता आला पाहिजे. आपण नेतृत्वाचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. गणपती सुखकर्ता आहे दुखहर्ता आहे. आपल्याला आपले जीवन तर सुखी करायचे आहेच परंतु, त्यासोबतच दुसर्‍यांचे दुःखसुद्धा संपवायचे आहे. प्रत्येक गणेश चतुर्थीला आपण अशा प्रकारे गुण घेतले, आत्मसात केले, तर व्यक्तीचा आणि समाजाचा उत्कर्ष नक्कीच होईल.


गणेश पूजा नेमकी किती जुनी आहे? कुठल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला गणेश पूजनाचा उल्लेख आढळतो?
वेदांमध्ये आपल्याला गणेश पूजनाचा उल्लेख आढळतो. प्रामुख्याने अर्थववेदामध्ये आपल्याला गणपतीचा उल्लेख आढळतो. सुमारे तीन ते चार हजार वर्षांपासून, गणपतीची पूजा केली जाते. पृथ्वीविषयक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीसुद्धा बुद्घीच्या या देवतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर ‘गणेश पुराण’ आणि ‘मुदगल पुराण’ यांचे जर आपण अध्ययन केले, तर आपल्याला याविषयी माहिती मिळते.


याच अनुषंगाने षोडशोपचार पूजेचे नेमके महत्त्व काय आहे?
आपल्या घरामध्ये जेव्हा कुणी अतिथी येतात, तेव्हा आपण त्यांचे आदरातिथ्य करतो, त्यांचा मानपान करतो. अगदी त्याचप्रकारे आपल्या घरी ज्यावेळेस गणपती येतो, तेव्हा अशाच पद्धतीचे आपण आदरातिथ्य करतो. आपण गणपतीचे १६ उपचारांनी पूजन करणे अपेक्षित असते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा १६ उपचारांनी जी पूजा केली जाते, तिला ‘षोडशोपचार पूजा’ म्हणतात. गणपतीची पूजा आपण ज्या वेळेस करतो, त्यावेळी आपण त्या मातीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून देवत्व आणत असतो. आणि आपण ज्यावेळेस मूर्तीचे विसर्जन करतो, त्यावेळेस उत्तरपूजा करून देवत्व काढून घेतो. आपण गणपतीचे विसर्जन करत नाही, गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतो.


काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती असतो, कुठे पाच, तर कुठे सात दिवसांचा गणपती असतो, या बाबतीतला शास्त्रविचार काय आहे?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे, तर त्याच दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे असते हा शास्त्रविचार आहे. मात्र, आपण इतकी सुंदर मूर्ती घरामध्ये आणतो, त्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करतो, त्यानिमित्ताने घरामध्ये आपल्या भोवताली चैतन्यमय वातावरण तयार होते. आपल्या घराण्यामध्ये पारंपरिकदृष्ट्या जे नियम असेल, त्या अनुषंगाने काही लोक दीड दिवसांचा, कुठे पाच दिवसांचा गणपती ठेवला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार आपल्याकडे पेरला तो लोकजागृतीसाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी! यानिमित्ताने समाजामध्ये विचारांची देवाणघेवाण होणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसांपेक्षासुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण या उत्सवकाळामध्ये गणपतीचे किती गुण आपल्या अंगी बाणवतो याला जास्त महत्त्व आहे.


गणेशोत्सवातील महत्त्वाचा भाग म्हणजे आरती. आरत्यांचे महत्त्व काय?
आर्त स्वरात म्हणायची ती आरती. आरती ओरडून म्हणण्याची नसते. पूजा केल्यानंतर आपण आरती करतो परंतु, ती आरती शुद्ध वाणीने म्हणणे गरजेचे आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये आरती म्हणायच्या आधी, आपण आरतीचे पुस्तक घेऊन सराव करायला हवा. ती आरती ऐकल्यानंतर आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटले पाहिजे. आपल्याकडे समर्थ रामदासांपासून अनेकांनी आरतीची रचना केली. त्यामागे भक्तीची एक भूमिका आहे, ते आपण समजून घेतली पाहिजे.


कधी कधी गणेशोत्सवादरम्यान काही अघटित घटना घडते व काही कुटुंबांना सुतक लागतं, अशावेळी गणेशपूजन करावे का?
आपल्या कुटुंबामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कधीकधी अडचणी येत असतात. काही वेळेला गणपती पूजन गणेश उत्सवात करणे शय होत नाही. एखाद्या वर्षी जर सुतक असेल, तर गणेशोत्सव साजरा केला नाही तरी चालेल. काही कारणाने खंड पडला असेल आणि उत्सव पुढच्या वर्षी साजरा करण्याचा विचार असेल, तर भाविक ते करू शकतात. हे करताना कुठल्याही प्रकारे मनात भीती असता कामा नये. माणसाने निर्भयपणे सण आणि उत्सव साजरे करावे आणि त्यास निर्भयपणे जगण्याचा विचारच ही देवता आपल्याला देत असते. गणपती संकट दूर करणारी देवता आहे, त्याच्याकडे प्रार्थना करावी.


पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आपल्या दृष्टीने महत्त्व काय?
गणेशोत्सव म्हटले की हल्ली आपल्याला असे दिसून येते की, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर केला जातो. लेझर लाईट लावल्या जातात. हे अत्यंत चुकीचे आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या समाजाच्या आरोग्यासाठी हे जास्त घातक आहे. गणेशोत्सवाचा सण हा असा सण आहे, ज्यामुळे माणसांमध्ये चैतन्य निर्माण होते. पूर्वीच्या काळी ज्या साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात असे, त्यातून निसर्गाचा आणि मानवाच्या व्यवहाराचा समतोल राखला जाई. गणेशोत्सवामुळे आपल्याला शाश्वत जीवनाचा मंत्र कळतो, सगुणाची भक्ती, निसर्गाचा सहवास या संगमातून आपलं जीवन आणखी समृद्ध होते. यामुळे ज्या ज्या प्रकारे शय होईल, त्या त्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायला हवा. अनेक ठिकाणी फुलांची आरास केली जाते, नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. अशाच वेगवेगळ्या प्रकारे आपण आपला उत्सव पर्यावरणपूरक करायला हवा.


गौरी-गणपतीमध्ये गौरीचे आणि गणपतीचे नाते नेमके काय आहे? काही ठिकाणी गौराईला आई न मानता गणपतीची बहीण, तर काही ठिकाणी बायको म्हणून पूजले जाते, तर याबद्दलचे शास्त्राच्या अनुषंगाने वास्तव सांगा.
अनुराधा नक्षत्र असताना, गौरीचे आगमन होते. या वर्षी दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.२५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे, तोपर्यंत गौरी आणावी. गौरी म्हणजे पार्वती, गणपतीची माता. कोल्हासूर राक्षसाचा वध करणारी महालक्ष्मी माता ती ही गौरी. ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन केले जाते. यावर्षी दि. १ सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे. गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते. यावर्षी दि. २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. रात्री ९.५० वाजेपर्यंत गौरी विसर्जन करायचे आहे. काही ठिकाणी तेरड्याच्या गौरी आणतात, तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी आणतात, काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरीही केल्या जातात, तर काही ठिकाणी गौरीची मूर्तीसुद्धा असते. घराण्यामध्ये गौरी पूजनाची जशी परंपरा असेल, त्या प्रकारे ही पूजा होते. गौरीचा हा सण माहेरवाशिणींचा सण असून, महिलांसाठी विशेष असतो. काही ठिकाणी ६४ भाज्यांचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. माहेरी मुलीचे कौतुक केले जाते, वातावरणामध्ये एक प्रकारचा आनंद असतो.


गणेशोत्सव आता केवळ भारतापुरता मर्यादित नसून, सातासमुद्रापार साजरा केला जातो. परदेशस्थ भारतीयसुद्धा भक्तिभावाने गणेशपूजन करतात. संस्कृतीच्या या प्रसाराबद्दल काय सांगाल?
नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, थायलंड, चांपा, इंडोनेशिया, जावा, बाली, बोरनियो, चीन, तुर्कस्तान, जपान, मेसिको आदी देशांमध्ये, गणपतीची पूजा केली जाते. गणपतीची अनेक मंदिरेसुद्धा या देशांमध्ये आहे. जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय माणूस गेला आहे, तिथे तिथे तो गणेशोत्सव साजरा करतो. हा गणेशोत्सव इतया उत्साहात साजरा होतो कारण, त्या विचारांमागच्या भक्तीचा कार्यकारणभाव परदेशी माणसं लक्षात घेतात आणि आपल्या संस्कृतीशी एकरूप होतात. त्यामुळे आपण आपल्या उत्सावामागचा शाश्वत विचार लोकांपर्यंत पोहोचवायला हवा.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.