अंतराळ अभ्यासकांची युवाशक्ती

    23-Aug-2025   
Total Views |

भारत हा तरुणांचा देश. या देशातील युवाशक्ती राष्ट्रउभारणीचे विधायक कार्य सातत्याने करीत असते. याला अंतराळ विज्ञानाचे क्षेत्रसुद्धा वर्ज्य नाही. अंतराळ मोहिमांमागचा भारतीय विचार इथपासून ते अवकाश मोहिमांचे पर्यावरणपूरक भविष्य इतया व्यापक क्षितिजावर काम करणारी युवकांची फळी भारतामध्ये आहे. आज ‘राष्ट्रीय अंतराळ दिना’च्यानिमित्ताने अशाच काही निवडक युवा अंतराळ अभ्यासकांचा, संशोधकांचा हा अल्पपरिचय...

राष्ट्रसामर्थ्याचा विचार मांडणारा अंतराळ अभ्यासक अर्चित गोखले

युवा अंतराळ अभ्यासक अर्चित गोखले हे नाव आपण अनेक ठिकाणी ऐकलं आणि वाचलं असेल. आपल्या सहज शैलीतून अंतराळ विश्वाची आणि अवकाशाची माहिती ते वेळोवेळी आपल्याला देत असतात. खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या मार्गदर्शनातून लहानपणीच त्यांना या विषयाची गोडी लागली. ‘आकाश मित्रमंडळ’सारख्या संस्थांमुळे त्यांची आवड वृद्धिंगत होत गेली. पुढे वेगवेगळी व्याख्याने अभ्यासवर्ग यांण्मुळे अंतराळ विज्ञानाचं आकलन त्यांना होत गेलं. इयत्ता दहावीत असताना ’journal sights and insights’ हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं, तर २०२२ साली ’befriending the sky’ हे पुस्तक प्रकाशित झालं. जगद्विख्यात अशा ’ted'x’च्या मंचावरून त्यांनी अनेकांना संबोधित केला आहे. आजसुद्धा वेगवेगळ्या समाजमाध्यमांतून अंतराळविश्वाची कोडी आपल्या सहज-सुलभ वाणीतून ते उलगडत असतात. ’journal of astronomy and astrophysics’ या मासिकामधील लेखासाठी त्यांनी सहलेखकाचीसुद्धा भूमिका बजावलेली आहे. अवकाश तंत्रज्ञानाबरोबरच एक व्यापक राष्ट्रहिताचा विचार त्या आपल्या अभ्यासातून लोकांसमोर मांडत असतात. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा विचार घेऊन जगणारा भारत देश अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा एका समृद्ध आणि संपन्न विश्वासाठी कार्यरत आहे, हे ते वेळोवेळी नमूद करतात. अवकाश तंत्रज्ञानाचा, ‘इस्रो’च्या मोहिमांचा आपल्या समाजावर काय परिणाम होतो, दैनंदिन जीवनातलं त्याचे महत्त्व काय, हेसुद्धा ते सांगतात. सामान्यांच्या परिभाषेत अंतराळज्ञानाचे महत्त्व विशद करताना, ‘इस्रो’च्या मोहिमांमधील अनेक गोष्टी अत्यंत रंजक पद्धतीने ते लोकांसमोर मांडतात.

नवोन्मेषाचा विचार मांडणारी रुचिरा सावंत

लहानपणापासूनच अंतराळविश्वात रममाण होणार्‍या रुचिरा सावंत आपल्या तरुणपणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या. वयाच्या १८व्या वर्षी आशियातील पहिल्या ‘सॅटनॉग्ज ओपन सोर्स ग्राऊंड स्टेशन’च्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. ‘मेकर्स असायलम’ या संस्थेशी रुचिरा जोडल्या गेल्या आणि पुढे जाऊन अनेक आगळ्यावेगळ्या प्रकल्पांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला. अंतराळविज्ञानाविषयी असलेलं कुतूहल, समजून घेण्याची इच्छा यामुळे एक वेगळी अनुभूती त्यांनी घेतली. त्यांचा हा प्रवास अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरला. २०१५ साली नेहरु तारांगण येथे ‘वेव्ह’ नावाच्या प्रदर्शनात ‘सॅटनॉग्ज’ प्रकल्प मांडण्यात आला होता. ज्येष्ठ अवकाशविज्ञान लेखक श्रीनिवास लक्ष्मण यांनी या प्रकल्पासाठी मुलाखत घेतली, यावेळी रुचिराला पाहून त्यांना आनंद झाला. पुढे रुचिरा आणि श्रीनिवास यांनी ‘स्पेस हॅण्डशेक’ नावाचा वेगळा मंचसुद्धा सुरू केला. "विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकांना विज्ञानापर्यंत घेऊन जाणे, ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांचे मत. "यासाठी सामान्य माणसांच्या भाषेत बोललं गेलं पाहिजे आणि लिहिलं गेलं पाहिजे; याचसाठी मी प्रयत्नशील आहे,” असे रुचिरा सांगतात.

‘स्पेस रेंजर्स’ची गरुडभरारी-स्नेहदीप कुमार आणि मोहित कुमार नायक

तारुण्य हे अफाट ऊर्जेचं आणि सर्जनाचं प्रतीक असतं, हे आपण अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र, याची खरी प्रचिती येते ती स्नेहदीप कुमार आणि मोहित कुमार नायक यांचं काम समजून घेतल्यावर!

भुवनेश्वर येथे लहानाचे मोठे झालेले हे दोघे वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी ‘युबसॅट’ नावाचा उपग्रह सध्या तयार करत आहेत. अवकाशातील ‘गॅमा’ किरणांच्या शोधासाठी या उपग्रहाची अत्यंत मोलाची मदत होणार आहे. "या शोधामुळे उपग्रहांवरील होणार्‍या खर्चाची बचत होईल,” असा दावा त्यांनी केला आहे. स्नेहदीप कुमार हा लंडनच्या ‘रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी’चा सर्वांत तरुण सहभागी सभासद (फेलो) आहे. २०२२ साली दोघांनी एकत्र येऊन ‘युबसॅट’चा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याविषयीची माहिती जितकी कौतुकास पात्र आहे, तितकेच त्यांच्या कामाचा हेतूसुद्धा तितकाच चांगला आहे. अवकाश मोहिमांमुळे अवकाशात मागे उरणार्‍या अवशेषांना (space debris) कमी करणं हा त्यांच्या दीर्घ काळ कार्यामागचा विचार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनात अवकाशाचा विचारसुद्धा किती मोलाचा आहे, याची आपल्याला यामुळे प्रचिती येते.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.