मुंबई : सशस्त्र बलुच लढवय्यांनी गेल्या १० दिवसांपासून खुजदार जिल्ह्यातील जेहरी भागावर कब्जा केला आहे. गुरुवारी लढवय्यांनी गजान, सोहिंदा आणि सुन्नी भागात पाकिस्तानच्या सैन्य दलांवर तीव्र हल्ले चढवले. या हल्ल्यांत सुरक्षा दलांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार बलुच लढवय्यांनी काही दिवसांपूर्वी जनसभेला संबोधित करून जेहरीवरील सशस्त्र कब्ज्याची सुरुवात केली. त्यावेळी शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा दलांवर घात लावून हल्ला करण्यात आला. नंतर लढवय्यांनी प्रवेशमार्ग बंद करून सैन्याची ये-जा थांबवली. इतकेच नाही तर सुन्नी-नूरगामा रस्त्यावर बुलडोझर चालवला. गजान आणि मश्क मार्गे पुढे सरकणाऱ्या सैनिकांवरही हल्ला करण्यात आला.
दरम्यान, पाकिस्तानच्या सेनेने अंजीरा आरसीडी क्रॉस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेहरीकडे जाणाऱ्या दोन युवकांना सैनिकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली.