मुंबई, वर्षातील काही दिवसांसाठी साजरा केला जाणारा गणेशोत्सव, वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला प्रदान करतो. यंदाच्या वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाचा दर्जा लक्षात घेता, यावर्षी सुद्धा गणेशोत्सव अत्यंत धूम धडाक्यात साजरा केला जाईल यामध्ये शंका नाही.
गणेशोत्सवासाठी यंदा सुद्धा भाविकांची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहे. घरगुती गणेशपूजनापासून ते सार्वजनिक गणेश उत्सवापर्यंत एकच उत्सवाचे वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. अशातच घरगुती मखरांची खरेदी सुरु असताना, पर्यावरणपूरक मखरांना सार्वाधिक मागणी असल्याचे आपल्याला बघायाला मिळते. कागदापासून विविध आकारांचे तयार केलेले मखर, त्यावर वेगवेगळ्या रंगांची कलाकुसर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्लास्टीकचा वापर टाळण्याकडे लोकांचा कल असून, शक्य त्या पद्धतीने गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसा करता येईल याकडे लोकांचा कल दिसून येतो. शाडू मातीच्या मूर्त्यांसाठी आग्रह धरत इको फ्रेंडली मखरांची सुद्धा भाविक मागणी करत आहेत. आकर्षक अशा ३ फुटांच्या मखरांच्या किंमतीची सुरुवात २,५०० ते ३,००० पासून होते. आकाराच्या आणि रंगांच्या अनुषंगाने विविध मखरांची आरास ग्राहक खरेदी करु शकतात.
कृत्रिम फुलांनी सजली बाजारपेठ
दादरच्या छबिलदास शाळेनजीकच्या मार्गावर कृत्रिम फुलांची सुंदर आरास आपल्याला इथल्या वेगवगेळ्या दुकानांमध्ये बघायला मिळते. सुटी कृत्रिम फुलं, या फुलांचे हार, माळा यांचे वेगवेगळे देखावे आपल्याला इथे बघायला मिळतात. बाजारामध्ये सध्या या कृत्रिम फुलांना सर्वाधिक मागणी असल्याचं बघायला मिळत आहे. एका बाजूला मखराच्या सजावटीसाठी या कृत्रिम फुलांचा वापर तर होतोच परंतु त्याचसोबत कृत्रिम फुलांच्या आधारे मखरांची निर्मिती करण्याकडे सुद्धा ग्राहकांचा कल आहे. विविधरंगी फुलांच्या माळा, ज्या साधारण ६ फुटांच्या आहेत, त्यांच्या किंमतीची सुरुवात २५० रुपयांपासून होते. त्याचबरोबर अर्धगोल आकारातील फुलांच्या मखराची सुरुवात विक्रीसाठी २००० रुपयांपासून होते.
मंदिररुपी आरासांना ग्राहकांची पसंतीपर्यावरण पूरक मखरांची खरेदी करीत असताना, दुसऱ्या बाजूला आकर्षक देखाव्यांमध्ये मंदिर रुपी आरासांना सुद्धा ग्राहकांची पसंती असल्याचे बघायला मिळाले आहे. सिद्धिविनायक मंदिरापासून ते अगदी तिरुपती बालाजी मंदिरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक देखावे बाजारामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अष्टविनायक मंदिरांची प्रतिकृती दाखवणाऱ्या आरसाची किंमत १५,००० रुपये असून, मोठ्या बालाजी मंदिराच्या आरसाची किंमत १६,००० इतकी आहे. भवानी मंदिराची प्रतिकृती दर्शवणाऱ्या मखराची किंमत १५,००० असून लहान आकारांच्या मूर्तींसाठी असलेल्या मंदिरांच्या देखाव्यांची किंमत ३,००० रुपयांपासून सुरू आहे.