अभाविपकडून दिल्ली विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांत तीव्र आंदोलन एक लाख रुपयांच्या निवडणूक बाँडची सक्ती व शुल्कवाढीविरोधात उठवला आवाज

    23-Aug-2025   
Total Views |

मुंबई  : अखिल भारतीय विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सर्व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध समस्यांविरोधात आवाज उठवला. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असूनही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी अजूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनापुढे अनेक मागण्या ठेवल्या. त्यामध्ये – विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या निवडणुकीसाठी सामान्य विद्यार्थ्यांना उमेदवारी रोखणारा आणि लोकशाही तत्त्वांच्या विरोधात जाणारा १ लाख रुपयांचा निवडणूक बाँड रद्द करणे; वाढवलेले शुल्क परत घेणे; सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करणे; हिंसामुक्त परिसर सुनिश्चित करणे; महिला विद्यार्थिनींसाठी कडक सुरक्षा व्यवस्था; क्रीडा सुविधांमध्ये योग्य साधने व प्रशिक्षक पुरवणे आणि अंतर्गत तक्रार समित्यांमध्ये पारदर्शकता आणणे यांचा समावेश होता. दिल्ली विद्यापीठातील जवळजवळ प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी या मुद्यांवर जोरदार निदर्शने केली, प्राचार्यंना निवेदन दिले आणि निश्चित कालमर्यादेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

अभाविप दिल्लीचे प्रांत मंत्री सार्थक शर्मा यावेळी म्हणाले, “आज ‘वन-डे ऑल कॉलेज प्रोटेस्ट’ दिल्ली विद्यापीठात पार पडले, ज्यात विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्या प्रशासनापुढे ठेवल्या गेल्या आणि तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. प्रमुख मुद्द्यांमध्ये १ लाख रुपयांचा निवडणूक बाँड रद्द करणे, शुल्कवाढ थांबवणे आणि अंतर्गत तक्रार समित्यांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. अभाविपने नेहमीच विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील.”


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक