ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! परदेशी ट्रक चालकांचे वर्क व्हिसा थांबवले

    22-Aug-2025   
Total Views |

वॉशिंग्टन डीसी : (US pauses Worker Visas for Commercial Truck Drivers) अमेरिकेतील फ्लोरिडा येथील भीषण अपघातानंतर ट्रम्प प्रशासनाने परदेशी ट्रक चालकांचे वर्क व्हिसा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सर्व व्यावसायिक ट्रक चालकांसाठी कामगार व्हिसा देणे थांबवले असल्याची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी एक्सवर केली.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

"अमेरिकेच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने परदेशी चालकांकडून चालवल्या जाणाऱ्या मोठ्या ट्रक्टर-ट्रेलर ट्रक्समुळे अमेरिकन लोकांचे जीव धोक्यात येत आहेत आणि अमेरिकन चालकांच्या उपजीविकेवर वाईट परिणाम होत आहेत." असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत.

फ्लोरिडा अपघातानंतर मोठे पाऊल

फ्लोरिडा येथे १२ ऑगस्ट रोजी झालेल्या एका अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी वाहन चालवत असलेल्या हरजींदर सिंग या भारतीय चालकामुळे हा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर हरजींदर सिंग याने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केल्याचे उघड झाले होते. सिंग याने २०१८ मध्ये मेक्सिको येथून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून अमेरिकेत प्रवेश केला होता आणि कॅलिफोर्निया येथे कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स मिळवले होते, अशी माहिती फ्लोरिडा हायवे सेफ्टी अँड मोटार व्हेइकल्सच्या फ्लोरिडा विभागाने दिली आहे.

होमलँड सिक्युरिटी विभागाने देखील या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी जाहीर केले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान सिंग याला वर्क परमिट नाकारण्यात आले होते, पण जो बायडन यांच्या प्रशासनात त्याने ते मिळवले.

सिंग याला त्यांच्या राज्यात लायसन्स मिळाल्याने कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम हेदेखील या राजकीय आरोप-प्रत्यारोपात अडकले आहेत. डीएचएस असिस्टंट सेक्रेटरी ट्रिशिया मॅग्लाग्लिन यांनी न्यूसम यांच्यावर टीका केली आहे. फ्लोरिडामध्ये तीन निष्पाप लोकांचा मृत्यू झाला कारण गॅविन न्यूसम यांच्या कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ मोटार व्हेयकलने बेकायदेशीर व्यक्तीला कमर्शियल ड्रायव्हर्स लायसन्स दिले. या राज्यातील प्रशासनव्यवस्था व्यवस्था खराब आहे." यादरम्यान सिंग याच्यावर खटला चालवण्यात आल्यानंतर त्याला हद्दपार केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\