मोनोचा जागतिक प्रवास

Total Views |

नुकत्याच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा आणि ‘बेस्ट’ची बससेवा विस्कळीत झाली. अशा वेळी मुंबईकरांना अखंडित सेवा देण्यात ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’ रेल्वेसेवेने मोठा हातभार लावला. मात्र, अचानक मोठ्या संख्येने प्रवासी एकाचवेळी मोनोमध्ये चढल्याने प्रवाशांच्या अतिरिक्त भारामुळे मोनो बंद पडली. यामुळे, आधीच घरघर लागलेल्या या मोनोच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले. मात्र, जगभरात किरकोळ तांत्रिक बिघाड वगळता, मोनो रेल्वेच्या कोणत्याही मोठ्या दुर्घटनेचे उदाहरण नाही.

२०२४ मध्ये जागतिक मोनोरेल बाजारपेठेचा आकार ६.६८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता आणि २०३४ पर्यंत तो सुमारे १०.१३ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. २०२५ ते २०३४ पर्यंत ४.२५ टक्क्यांच्या ‘सीएजीआर’ने हा आकार वाढेल. सार्वजनिक वाहतुकीची वाढती मागणी, पर्यावरणीय शाश्वतता आणि वाढती गुंतवणूक हे मोनोरेल बाजारपेठेच्या वाढीचे प्रमुख घटक. अशातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रगत वैशिष्ट्यांद्वारे रेल्वे आणि वाहतूक प्रणालींमध्ये क्रांती घडवून आणत आहे. ‘एआय’ आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) रेल्वेमध्ये झपाट्याने डिजिटलायझेशन घडवून आणत आहे. पारंपरिक रेल्वे प्रणालींना तोंड द्यावे लागणार्या अनेक आव्हानांवर ‘एआय’द्वारे मात करणे शय आहे. मोनोरेल सिस्टममध्ये ‘एआय’ एकत्रित केल्याने लोकोपायलट अनेक अडथळे शोधून ते रोखू शकतात. २०२४ मध्ये मोनोरेलच्या जागतिक बाजारपेठेत हिंद-प्रशांत महासागरातील क्षेत्राने महसूल वाट्यात ४० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान दिले.

मोनोरेल सिस्टम मार्केटमध्ये चीनचा मोठा वाटा. वाढती लोकसंख्या आणि जलद शहरीकरणामुळे मोनोरेलसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मागणी वाढताना दिसते. मोनोरेल सिस्टमच्या विकासासाठी सरकारचा मजबूत पाठिंबा बाजारपेठेच्या वाढीस पोषक ठरतो. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणासारख्या तांत्रिक प्रगतीमुळे बाजाराच्या वाढीस मदत होते. प्रगत पायाभूत सुविधांच्या विकासात वाढती गुंतवणूक आणि विद्यमान मेट्रो लाईन्सशी एकात्मता यामुळे बाजारपेठेतील गुंतवणुकीत वाढ होते.

मार्च २०१९ मध्ये, भारताने मुंबईत आपला पहिला मोनोरेल प्रकल्प पूर्ण केला. सप्टेंबर २०२३ पर्यंत, अमेरिकेत १६, तर कॅनडात सहा मोनोरेल सिस्टम वापरात आहेत. तसेच युरोपमध्येही मोनोरेल सिस्टम लक्षणीय दराने वाढत आहे.

मोनोरेल एकावेळी फक्त चार ते सहा डबे आणि काही ठिकाणी आठ डबे वाहून नेण्यास सक्षम आहे. जगात अनेक ठिकाणी मोनोरेलचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत केला जातो. चीन, मलेशिया, जपान, इराण, जर्मनी, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांत मोनोरेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावते.

जगात दोन प्रकारच्या मोनोरेल अस्तित्वात आहेत. त्यांपैकी एक ‘स्ट्राडेल मोनोरेल’ आणि ‘सस्पेंडेड मोनोरेल.’ मुंबईत पहिल्या प्रकारची मोनो धावते. या प्रकारच्या मोनोरेलमध्ये गाडी एका बीमवरून धावते. या गाडीला बीमवर पसरलेले ‘वॉकिंग व्हिल्स’ असतात, त्याबरोबरच ‘गायडिंग व्हिल्स’ आणि ‘स्टॅबलायझिंग व्हिल्स’ही असतात, जे बीमच्या दोन्ही बाजूला धरून ठेवतात. या प्रकारची गाडी छोटी जागा असलेल्या दाट शहरी भागातील वाहतुकीसाठी उपयुक्त ठरते. त्याबरोबरच डोंगरी भाग, किनारी वस्त्या इथेही ही गाडी उपयुक्त आहे.

जलद शहरीकरण, वाढती वाहतुककोंडी आणि वाढती लोकसंख्या हे जगातील मोनोरेल बाजारपेठेच्या वाढीला लक्षणीय चालना देईल, अशी अपेक्षा आहे. जलद शहरीकरण, दैनंदिन प्रवाशांची संख्या वाढणे, रस्त्यावरील वाहतुककोंडी वाढणे आणि लहान जागांची उपलब्धता यामुळे सरकार मोनोरेल प्रणालींना प्राधान्य देत आहेत. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये मोनोरेल सिस्टमचा वाढता वापर पाहता, मोनोरेल सिस्टम बाजारपेठेचे भविष्य आशादायक आहे. भारत, सौदी अरेबिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड इत्यादी विकसनशील देश त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा भाग म्हणून सक्रियपणे मोनोरेल सिस्टम बसवत आहेत. अशा देशांची सरकारे लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करतात. ते मोनोरेल सिस्टमच्या विकास आणि वापराला गती देण्यासाठी निधी देऊनदेखील योगदान देतात.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.