पालघर, पालघर जिल्ह्यातील मासेमारी समुदायात भीतीचे सावट पसरले आहे. खोल समुद्रात गेलेल्या नऊ मासेमारी नौका अद्याप परतल्या नसून त्यांचा मागमूसही लागलेला नाही. यापैकी वसईहून गेलेल्या तीन नौकांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तसेच प्रशासनातही चिंतेचे वातावरण आहे.
हवामान खात्याने समुद्र खवळलेला असून वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ६५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शोध व बचाव मोहिमेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. याआधीच हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वी सर्व खोल समुद्रातील मासेमारी नौकांना तातडीने परत यावे, असा इशारा दिला होता.
सुरुवातीला पालघर जिल्ह्यातील एकूण १९ नौका समुद्रात अडकल्या होत्या. त्यात वसईतील १३, खोचीवाडेतील २ आणि सापटी बंदरातील ४ नौकांचा समावेश होता. यापैकी वसईतील १३ पैकी १० नौका उशिरा परत वसई बंदरात दाखल झाल्या, ही दिलासा देणारी बाब आहे. तर सापटी बंदरातील ४ नौका आणि खोचीवाड्यातील २ नौका गुजरातमधील जाफराबाद येथील नवाबंदरात आश्रय घेण्यात यशस्वी झाल्या आहेत.
तरीसुद्धा अजूनही वसईतील ३ आणि इतर काही नौकांबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. या नौका व मच्छीमार सुरक्षित परत यावेत, यासाठी ग्रामस्थ व कुटुंबीय व्याकुळतेने वाट पाहत आहेत.