शुक्रवारचा नमाज पढणे अनिवार्य आणि सक्तीचे! जर नमाज पढला नाही, तर दोन वर्षे तुरुंगवास आणि तीन हजार रिंगित (लगभग ६१ हजार, ७८०) दंड भरावा लागेल. जर यातून सुटका हवी असेल, तर नमाज न पडण्याचे सबळ कारण देणे गरजेचे आहे, असा कायदा नुकताच मलेशियामधील मलेशियाई इस्लामिक पक्षानेे तेरेंगानु राज्यात केला. हे राज्य ९९ टक्के मुस्लीमबहुल आणि तसे मलेशिया हे अधिकृतरित्या इस्लामिक राष्ट्रच. इथे ६१.३ टक्के मुस्लीम, १९.८ टक्के बौद्ध, ९.२ ख्रिश्चन, तर ६.३ टक्के हिंदू धर्मीय राहतात.
तसे हिंदू पुराणकथा आणि बौद्ध साहित्यामध्ये मलाया प्रायद्वीपाचा ‘सुवर्णद्वीप’ म्हणून उल्लेख आहे. पुरातत्त्व अवशेषानुसार इ. स. पूर्व दुसर्या शताब्दीमध्ये इथे अनेक भारतीय व्यापार्यांची ये-जा होती. तेव्हा इथे ‘लंकाशुक’ नावाच्या भारतीय राजाचे साम्राज्य होते. पुढे तिसर्या शताब्दीमध्ये इंडोचीनच्या फुनान राज्याने इथे कब्जा केला. नंतर १३व्या शतकात इस्लामिक आक्रमकांनी इथे प्रवेश केला आणि मलेशिया हे इस्लामिक राज्य झाले ते आजतागायत. शतकानुशतके इथे मुस्लीम कट्टरता रूजली आहे.
अर्थात, या कट्टरतेसोबतच सत्तेत राहण्याची राजकीय प्रवृत्तीही सहभागी आहेच. त्यामुळे मलेशियामध्ये प्रत्येक राज्यातील निवडणुकीनुसार नियम आणि कायदे बदलत असतात. जिथे मुस्लीमबहुल लोक राहतात, तिथे ‘शरिया’ कायद्यालाही मागे सारतील, इतके कट्टरतापूर्वक इस्लामिक कायदे; तर जिथे गैर-मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असेल, तिथे न्यायालयाच्या कक्षेतून ‘शरिया’ कायदाही मलेशियाच्या सरकारने हटवला आहेत. असे जरी असले, तरी इथल्या शासनाला आणि लोकांना अजिबात विसर पडत नाही की, मलेशिया हे इस्लामिक राष्ट्र आहे. याचे उदाहरण म्हणजे, इथे १८९४ साली बांधलेले श्री पथर कालिअम्मा मंदिर. देवीची इथे सहा फूट उंच मूर्ती होती. २०१४ साली या मंदिराचा परिसर मलेशियाई टेक्सटाईल कंपनी ‘जैकल’ने खरेदी केला. त्यांनी प्रस्ताव केला की, जिथे मंदिर आहे, तिथे त्याच जागी मशीद उभी करायची. त्यावेळी इथल्या हिंदूंनी विरोध केला. मात्र, ते मंदिर तिथून काढून ५० मीटर अंतरावर स्थानांतरित करण्यात आले. याचबरोबर गैर-मुस्लिमांचे धर्मांतरणही झाल्याच्या अनेक घटना या देशात सातत्याने घडत असतात. गैर-मुस्लिमांसोबत किन्नरांसाठीही इथे कडक नियमावली! मुस्लीम म्हणून जन्मलेल्या किन्नरांनी सार्वजनिक जीवनात स्त्रीचा वेश परिधान केला, तर त्यांना शिक्षाच. त्यांनी पुरुष वेशातच राहायचे, असा हा दंडक!
अशा या मलेशियामध्ये हिंदू संस्कृतीचे अंतरंग कुठे ना कुठे आहेच. मलेशियाची एक प्राचीन कथा हिकायत सेरीराम. यातली एक घटना. नबी प्रसन्न झाले आणि त्यांनी अल्लाला विनंती केली की, वानाला पृथ्वी, स्वर्ग आणि नरक तिघांचाही राजा बनव. मग वाना तिन्ही लोकांचा राजा बनतो. पण, या वानाचे नबी दशरथचा पुत्र सेरीरामबरोबर युद्ध होते. त्यात त्याचा खात्मा होतो. या सगळ्यामध्ये आपल्याला दशरथ नाव ओळखीचे वाटते. हो, ‘हिकायत रामायण’ हे रामायणाचे मलयी रूप आहे. मुस्लीम आक्रांतामुळे या मलेशियन रामायणामध्ये पात्रांची नावे आणि काही घटनाही बदलल्या. सेरीराम म्हणजे? तर सेरी म्हणजे श्री आणि राम म्हणजे आपले प्रभू श्रीराम. वाना म्हणजे रावण आणि इथे नबी म्हणजे ईश्वराचा दूत या अर्थाने दशरथ यांना चक्क ‘नबी दशरथ’ म्हणूनही म्हटले गेले आहे. तर असा हा मलेशिया. मात्र, सेरीरामाची आख्यायिका जपणारा मलेशिया झपाट्याने कट्टरतेकडे झुकत आहे.
का? तर इथले सरकार आणि राजेशाही तसेच, कट्टरपंथी संस्था हे इस्लामचे कडवे समर्थक आहेत. मात्र, इथल्या मुस्लीम जनतेवर मलेशियाच्या गैर-इस्लामिक संस्कृतीची भुरळ पडत आहे. एका सर्वेक्षणानुसार, इथले मुस्लीम दाम्पत्य कुटुंब नियोजनावर भर देत आहेत. तसेच, गैर- मुस्लीम संस्कृतीकडे त्यांचा ओढा जास्त होताना दिसत असून, आधुनिकीकरणाकडे ते वळत आहेत. यावर उपाय म्हणून इथल्या इस्लामिक अभ्यासकांना वाटते की, इस्लामशी लोक जोडली गेली, तर ते आधुनिकतेपासून दूर राहतील. त्यामुळेच मलेशियाचे सरकार नवेनवे कायदे काढत असते. त्यातलाच हा नमाज पढणे अनिवार्य कायदा. अर्थात जबरदस्तीने देवाची पूजा केल्याचे फळ काय? हा प्रश्न आपल्या हिंदूंना पडतो. तिथे तसे काही नसावे; किंबहुना नसतेच!