केडीएमसीचे कर्करोग मुक्त अभियान

    21-Aug-2025   
Total Views |

कल्याण : केडीएमसीच्या आरोग्य विभागातर्फे असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मिशन शक्ती : कर्करोग मुक्त अभियान हा एक अतिशय महत्वकांक्षी कार्यक्रम आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे.

महापालिका आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अनोखा कर्करोग तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचे लवकर निदान, पुढील तपासणी आणि उपचार यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेच्या आशा सेविकांमार्फत महापालिका हद्दीत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातून संशयित लक्षणे असणाऱ्या महिलांची ‘टाटा मेमोरियल सेंटरचे तज्ञ डॉक्टर’ आणि ‘नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी’ यांच्या टिम मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासण्या केल्यानंतर गरजेनुसार महिलांना पुढील उपचाराची सोय टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे करुन दिली जाईल. १५ ऑगस्टला आयुक्त गोयल यांच्या हस्ते मिशन शक्ती-कर्करोग मुक्त अभियानाच्या बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आले. महिलांमध्ये कर्करोगाविषयी जन जागरुकता निर्माण करणे आणि वेळेत निदान होण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. महापालिका आणि टाटा हॉस्पिटल यांच्या संयुक्त सहकार्याने होणारी ही मोहिम महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास आयुक्त गोयल यांनी व्यक्त केला आहे. सर्वेक्षणादरम्यान सर्व महिलांनी आशा सेविकांना आरोग्यविषयक माहिती देऊन, स्वत:ला काही लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.