मुंबई : दिलीप कांबळे गणेश कला केंद्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक दिली जात आहे. नागरिकांनी उत्सव साजरा करत असताना, पर्यावरणाचा समतोल राखायाला हवा असा संदेश हे केंद्र आपल्या कृतीतून देत आहे. दिलीप कांबळे स्वता आपल्या हातांनी गणरायाची मूर्ती घडवतात. मूर्तीकार म्हणून आकर्षक मूर्त्या बनवणाऱ्या दिलीप कांबळे यांचा प्रवास मात्र तितकाच संघर्षाचा आणि म्हणूनच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
वयाच्या २१ व्यावर्षी दिलीप कांबळे यांना रक्ताचा कर्करोग झाला. कोकिलाबेन रुग्णालयात काम करत असताना, त्यांना या रोगाचे निदान झाले. यानंतर टाटा रुगणालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्याकडे आता केवळ ६ महिन्यांचा कालावधी उरला आहे. परंतु दिलीप कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी या आजाराचा सामना करायाचा निर्णय घेतला. त्यांची आई व भावाने दिलीपजींच्या उपचारासाठी पैसे उभे केले. १८ महिन्यांच्या उपचार केल्यानंतर सुद्धा दिलीपजींना बरं व्हायाला तब्बल ६ वर्ष लागली. यानंतर मात्र, दिलीजजींनी आपल्या आयुष्याला वेगळं वळण द्यायचा निर्णय घेतला. २०१३ झाली त्यांनी त्यांच्या दिलीप कांबळे गणेश कला केंद्राची स्थापना केली. सुरुवातीला कला केंद्र उभारताना, त्यांना स्थानिक प्रशासनाशी काही काळ संघर्ष करावा लागला. मात्र आपली बाजू सत्याची आहे असा विश्वास असेल तर लोकं सुद्धा आपल्या मदतीला धावून येतात याची त्यांना प्रचिती आली आणि अखेर कला केंद्राचा 'श्री गणेशा'झाला. त्यांच्या कला केंद्राच्या कामासाठी असंख्य मदतीचे हात धावून आले, याच हातांनी त्यांच्यातील कलाकाराला बळ दिलं असं ते आवर्जून सांगतात. मागच्या ३ वर्षांपासून ते सातत्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आपल्या कृतीतून प्रचार करतात. अंधेरी येथील त्यांच्या या कार्यशाळेत आता केवळ पर्यावरणपूरक मूर्त्या आहेत.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या भाविकांनी घेऊ नये असं ते भाविकांना आवर्जून सांगतात व श्रद्धेचा उत्सव पर्यावरणपूरत पद्धतीने साजरा करावा असा संदेश ते आपल्या कामाच्या माध्यमातून सगळ्यांना देतात.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.